आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जातपंचायत बरखास्त करा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पित्याने आपल्या गरोदर मुलीचा खून केल्याच्या तसेच जात पंचायतीच्या न्यायालयाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केलेल्या सामान्य कुटुंबांना बहिष्कृत केल्याच्या निषेधार्थ मिश्र विवाह चळवळीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

जातपंचायत बरखास्त करा, जातपंचायचा निषेध असो, अशा घोषणा देत महिला व युवकांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मेहेर सिग्नल, सीबीएसमार्गे निघालेल्या या मोर्चाची आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता झाली. बहिष्कृत केलेल्यांचे प्रतिनिधीही लासलगावसारख्या ठिकाणाहून येऊन सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या. निवेदनामध्ये जात पंचायतीच्या बहिष्काराला बळी पडलेल्यांना न्याय द्यावा, जात पंचायतच बरखास्त करावी, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनस्तरावर देण्यात येणार्‍या 50 हजार रुपये अनुदानात दोन लाख ते तीन लाखांपर्यंत वाढ करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यामध्ये महादेव कुळे, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, महेंद्र दातरंगे, अँड. शरद कोकाटे, राजू देसले, सुधीर धुमाळ, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, राम गायते, वसंत हुदलीकर, भूषण काळे, राजेश जाधव, कृष्णा चांदगुडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जात पंचायतीवर मोक्का लावावा

जातपंचायत ही संघटित गुन्हेगारी असून, त्यावर मोक्का लावावा तसेच पोलिस कोठडीतील जात पंचायतीच्या लोकांची कोठडी वाढविण्यात यावी व यासंदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली.