आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी उत्पन्नात पंजाबनंतर नाशिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकच्या शेतकर्‍यांच्या दरडोई उत्पन्नामुळे कृषी उत्पन्नाबाबत पंजाबनंतर नाशिकचा क्रमांक लागतो, असे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. डोंगरे वसतिगृह मैदानावर शुक्रवारपासून आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

शेतीची गरज, अल्प मनुष्यबळ आणि कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी विविध प्रयोग करून कृषीक्षेत्रात बदल केला आहे. प्रयोगशील शेतकर्‍यांचे प्रयोग संकलित करून कृषी विद्यापीठांनी ते अभ्यासले पाहिजेत, असे थोरात म्हणाले.

नाशिक कृषी प्रयोगांसाठी आदर्श जिल्हा आहे. डाळिंब, द्राक्षावरील विविध प्रयोगांनी येथील शेतकर्‍यांनी आदर्श निर्माण केला. द्राक्ष वायनरीजसारखे प्रयोग राज्यभरात अनुसरले जात असल्याचे ते म्हणाले.

राज्यभरातील प्रयोगशील शेतकर्‍यांचा प्रदर्शनात सत्कार या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले. कायमच संकटाच्या छायेत जगणार्‍या शेतकर्‍याला स्थैर्य मिळवून देण्यासाठी शासनासह सामाजिक संस्थांचेही प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून सातत्याने होत असल्यानेच हे प्रदर्शन जगभरात नावारूपाला आल्याचे थोरात म्हणाले.

व्यासपीठावर माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कपाडिया, उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, ‘नाडा’चे अध्यक्ष विजय पाटील, आयोजक संजय न्याहारकर आदी होते.

प्रदर्शनात आहेत ही मुख्य आकर्षणे
या प्रदर्शनात देशी-विदेशी कंपन्यांनी सादर केलेली कृषी औजारे, र्जमन कंपनीचे ग्रेडेशन मशीन, हार्वेस्टर, ट्रॅक्टर्स, स्प्रेडर्स आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पिकविलेला भाजीपाला, फळेही असून, तब्बल पावणेदोन किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा पेरू शेतकर्‍यांचे आकर्षण ठरत आहे. या कृषी कुंभमेळ्यात केवळ एक रुपया भरून मिनी ट्रॅक्टर घरी नेण्याचे स्वप्नही साकारत आहे.

एक रुपया भरा आणि घरी घेऊन जा ट्रॅक्टर
बोरस्ते एंटरप्रायजेसने एल अँण्ड टी फायननान्सच्या सहकार्याने एक योजना सादर केली आहे. एक रुपया भरून भारतातील पहिला फोर व्हिल ड्राइव्ह मिनी ट्रॅक्टर घरी नेता येत आहे. व्हीएसटी मित्सुबिशी कंपनीचे ट्रॅक्टर मॉडेल्स प्रदर्शनात सादर करण्यात आले असून, हे मिनी ट्रॅक्टर्स कल्टिव्हेटिंग, वखरणी, वाहतूक, प्युडलिंग, नांगरणी, स्प्रेडिंग यांसारख्या बहुतांश कामात उपयुक्त आहेत.

रंगीबेरंगी फुलांची रोपे प्रदर्शनाचे आकर्षण
बंगळुरूच्या पुष्पवन फ्लोरिस्ट नर्सरी अँण्ड फार्मने मांडलेली रंगीबेरंगी फुले महिलावर्गाचे आकर्षण ठरत आहेत. आजच्या फ्लॅट सिस्टिमच्या जमान्यातही अगदी कमी जागेत आणि घरातही लावता येणारी फूलरोपे या नर्सरीने सादर केली आहेत. हायब्रिड डेलिया बल्ब्स, ट्यूबरोझ डबल आणि सिंगल लिली, हायब्रिड क्रिसान्टिमम, एशियाटिक लिली यांसारख्या मनमोहक फुलांचे बियाणे, कंद आणि भाजीपाल्यांचे बियाणे येथे उपलब्ध आहेत.