आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तातील इंटरनेट पॅकेजेस, सिमकार्ड अन‌् स्मार्ट फाेनने वाढविले सायबर गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माेफत सिमकार्ड, कमी शुल्कातील इंटरनेट पॅकेजेस अाणि स्मार्ट फाेन्स हे डिजिटल युगाची सर्वात माेठी हत्यारे ठरत असून, त्यामुळेच सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ हाेत असल्याचा पाेलिसांचा निष्कर्ष अाहे. विशेषत: इंटरनेट पॅकेजेसने धुमाकूळ घातल्याने या माध्यमातून फेसबुक, व्हाॅट‌्सअॅप अाणि व्हिडिअाे काॅल्सद्वारे अपप्रकार वाढले अाहेत. माेबाइल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे अाॅफर कमी हाेण्याची शक्यता नसल्याने ही स्थिती दिवसेंदिवस बिकट हाेण्याची चिन्हे अाहेत. तांत्रिक बाबींमुळे ते तडकाफडकी राेखणेही पाेलिसांना शक्य हाेत नसल्याचे निदर्शनास येत अाहे. 
 
एकवेळ अणुबॉम्ब, युद्ध यातून जगाला सावरता येईल, पण मोबाइलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात असणाऱ्या आणि आपल्या मूडनुसार वापर होणाऱ्या दहशतवादापासून संरक्षण मिळवण्याकरिता आपणाकडे अद्याप तरी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. सायबर गुन्हेगारीची वाढती प्रकरणे अाणि विशेषत: त्यात अल्पवयीन मुली, तरुणी अाणि महिलांची केली जाणारी बदनामी यामुळे सध्या शहरात चिंता व्यक्त केली जात अाहे.
 
 या गुन्हेगारीमागील कारणमीमांसा करताना पाेलिस विभागही ‘माेबाइल क्रांती’कडेच अंगुलीनिर्देश करीत अाहे. अाज जवळपास प्रत्येकाच्याच हातात स्मार्ट माेबाइल फाेन अाणि त्यात इंटरनेटचे स्वस्तातील पॅकेजेस अाहेत. पूर्वी केवळ अतिमहत्त्वाच्याच कामासाठी इंटरनेटचा वापर केला जात हाेता.
 
अाता मात्र अनावश्यक वापर वाढला अाहे. परिणामत: पाॅर्न फिल्म बघणे, अश्लील चॅटिंग करणे, खासगी क्षण रेकाॅर्ड करणे, जाेडीदाराचा विश्वासघात करून खासगी क्षणांचा बाजार मांडणे, ब्लॅकमेलिंग करणे यांसारखे प्रकारही या काळात वाढले अाहे.
 
काही ‘महाभाग’ त्यावरही कडी करीत थेट या सवयींचे रूपांतर गुन्हेगारीत करीत अाहेत. अर्थात मानसशास्त्राच्या दृष्टी अशा सवयी या विकृतीकडे झुकणाऱ्या असल्याचे सांगितले जाते. त्यातून सायबर गुन्हेगारांकडून निर्दोष व्यक्तींना बदनाम करण्याचे प्रकार सर्रास केले जात आहेत. हे गुन्हे वाढविण्यात स्मार्ट फोनची भूमिकाही खलनायकासारखी आहे.
 
दुसरीकडे, सिमकार्ड मिळणेही अतिशय साेपे असल्याने बनावट नावे वापरून असे कार्ड सर्रासपणे खरेदी केले जात अाहेत. या सिमकार्डस‌‌्चा वापरही गुन्हेगारीसाठी केला जात असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट हाेते. मुळात किशोरवयीनांना आपण जे काही करतो आहे, त्यात काही चूक आहे, असे वाटत नाही, शिवाय आपण जे करतो त्याची काही शिक्षा असू शकते, हे माहीत नसते, केवळ काहीतरी गंमत, थ्रील अन‌् काय मजा या मानसिकतेतून असे गुन्हे सहजपणे घडतात. आपल्या अधिकारावर झालेले अतिक्रमण, बदला, क्रोध किंवा आनंदाने प्रेरित होऊनही, १३ ते २५ वयोगटांतील तरुण लोक आयटी कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हेगारीचा गैरवापर करण्यात आघाडीवर आहेत. 
 
इ-साहित्य प्रसारित करण्यात ११७ टक्के झाली वाढ 
नॅशनल क्राइम रेकॉर्ड‌्स ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताने स्मार्ट फोनच्या वापरातील जागतिक पातळीवर अग्रमानांकन मिळवतानाच २०१२ पासून २०१७ पर्यंत मोबाइलवरून इ-साहित्य प्रसारित करण्याच्या बाबतीत ११७ टक्के इतकी वाढ झाली आहे. स्मार्ट फोन्स वापरकर्त्यांच्या वाढीमुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) अधिनियम २००० अंतर्गत नोंदणीकृत प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. 
 
अॅप्सही ठरतात गुन्हेगारांना पूरक 
मोबाइलवर असणारे अॅप्लिकेशन्सही गुन्हेगारांना मदतगार ठरत अाहेत. अनेक अॅप्सवर लाइव्ह व्हिडिअाे चॅटिंग केले जाते. अशा अॅप्सवर अश्लील चॅट करण्यावरच अधिक भर दिला जाताे. विशेष म्हणजे संबंधित अॅपचे संचालक व्हिडिअाे रेकाॅर्डिंग हाेणार नाही असे तंत्रज्ञान वापरल्याचा दावा करीत असले, तरीही प्ले स्टाेअरवर व्हिडिअाे रेकाॅर्डिंग करणारे अनेक अॅप्सही उपलब्ध अाहेत. त्यातून समाेरच्याला फसविण्याचे प्रकार वाढले अाहेत. 
 
४०ते ४५ टक्के गुन्हे माेबाइलवरून 
गुन्हा झाल्यानंतर जर का सिमकार्ड नष्ट केले तर त्याचा तपास करणे कठीण होते, हे आता सायबर गुन्हेगारांना चांगलेच माहीत झाले आहे. भारतात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपैकी जवळपास ४० ते ४५ टक्के गुन्हे हे मोबाइलवरून केले जातात, असा क्राइम अहवाल सांगतो. 
 
८० टक्के गुन्हे इलेक्ट्राॅनिक स्वरूपात 
आयटी कायद्यानुसार नऊ वेगवेगळ्या गटांमध्ये सायबर गुन्ह्यांचा उल्लेख आहे. तथापि, ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात हॅकिंग आणि इ-साहित्याशी संबंधित आहेत. २०१२ मध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक होती, २०१७ मध्ये ती ४५ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. 
 
तक्रारींसाठी करा संपर्क 
सायबर क्राइमशी संबंधित काेणाच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी ९७६२१००१०० या व्हॉट‌्सअॅप क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गाेपनीय ठेवले जाते. 
बातम्या आणखी आहेत...