आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांज्याने चिरला गळा, शहरातील रस्त्यांवर दहशत नायलॉन मांज्याची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नायलॉनमांजा किती जीवघेणा आहे, याचा भयंकर अनुभव नाशिककरांनी बुधवारी घेतला. दिवसभरातील तीन घटनांमध्ये दोघांना अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन एका मांजरीला जीव गमवावा लागला.
बुधवारी सकाळी भिकुसा लेनमध्ये एका मांजरीने नायलॉन मांज्याने गळा चिरल्यामुळे तडफडत प्राण सोडला. त्यानंतर दुपारी जेलरोडला तेजस गुरव या 18 वर्षांच्या तरुणाच्या बुबुळाला गंभीर जखम झाली. सुदैवानेच त्याचा डोळा वाचला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धात्रक फाटा परिसरातून मोटारसायकलवरून जात असताना श्रीकांत विश्वकर्मा यांचा गळा अक्षरश: चिरला गेला. ही जखम थेट त्यांच्या स्वरयंत्रापर्यंत झाली असून, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचा जीव वाचू शकला.
तीन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या या घटना पाहता नायलॉन मांज्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावरून अक्षरश: जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत असल्याचे विदारक सत्य बुधवारी पुन्हा एकदा समोर आले. नायलॉन मांज्याची दहशत संपूर्ण शहरात पसरली असून, घरातून निघालेली व्यक्ती सुखरूप घरी पोहोचेलच, याची शाश्वती यामुळे देता येत नसल्याची संतप्त भावना व्यक्त होऊ लागली आहे. प्रशासनाने नायलॉन मांज्याच्या या दहशतीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज शहरवासीय व्यक्त करीत आहेत. शहरातील अनेक समाजसेवी संस्थांसह अगदी काही विक्रेत्यांनीही नायलाॅन मांजा हद्दपार करण्याचा चंग बांधलेला असताना त्याचा वापर सुरूच असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जेल रोड भागात तेजस गुरव याचे नायलॉन मांज्याने बुबुळच कापले.