आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीत पुरलेले अर्भक काढले बाहेर, ‘दिव्य मराठी’ने फाेडली वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अवैध गर्भपात प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या निलंबित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.४) फॉरेन्सिक लॅब, तहसीलदार पोलिसांच्या संयुक्त पथकाने अमरधाम येथे पुरलेले अर्भक जमिनीबाहेर काढले. अर्भकाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून, वैद्यकीय अहवालानंतर डॉ. लहाडे यांच्या कृत्याचा पर्दाफाश होणार आहे. 
 
या प्रकरणाचा ‘दिव्य मराठी’ने सर्वात आधी पर्दाफाश केला, तसेच त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा करून हे प्रकरण तडीस नेले आहे. डॉ. लहाडे यांच्याविरोधात एप्रिलला म्हसरूळ आणि १६ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात महापालिका समितीने पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून डॉ. लहाडे फरार होत्या. डॉ. लहाडे यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर तीन वेळा सुनावणी झाली. जामीन मिळणे अशक्य असल्याने डॉ. लहाडे शुक्रवारी (दि. २८) सरकारवाडा पोलिसांना शरण आल्या. 

त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर आणखी दोन दिवस पोलिस कोठडी वाढवण्यात आली. गुरुवारी (दि. ४) डॉ. लहाडे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. 

जमिनीत पुरलेले अर्भक बाहेर काढले आहे. तसेच डॉ. लहाडे यांच्या संपर्कात कोण कोण होते याची तंत्रविश्लेषन शाखेकडून तपास होणे बाकी असल्याने पाच दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने डॉ. लहाडे यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, अमरधाम येथे पुरलेले अर्भक हे तहसीलदार राजश्री अहिरराव, फॉरेन्सिक लॅबचे डॉ. आनंद पवार, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. वैभव धूम, सहायक पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, सातपुते यांच्या पथकाने बाहेर काढले. 

वैद्यकीय अहवालानंतर होणार पर्दाफाश 
बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्यासाठी जमिनीत पुरलेले अर्भक बाहेर काढण्यात आले आहे. या अर्भकाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून, ते नमुने कलिना येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. यानंतर या प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे. 
अवैध गर्भापात प्रकरणातील पुरलेले अर्भक बाहेर काढताना तहसीलदार राजश्री आहिरराव, डॉ. निखिल सैंदाने, डॉ. वैभव धूम, सहायक पोलिस निरिक्षक पुष्पा निमसे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...