आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invalid Banner News In Nashik, Invalid Banner In Nashik Road At Nashik, Divya Marathi,

दोन बळी जाऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ रस्त्यावरच, होर्डिंग्ज कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोतील त्रिमूर्ती चौकात वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकच्या धडकेने शनिवारी दोन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची दुर्घटना घडूनही या ठिकाणची परिस्थिती रविवारी दुसर्‍या दिवशीही ‘जैसे थे’च दिसून आली. या ठिकाणी दुकानांमध्ये खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होते आणि त्यातच अनधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंग्जची भर पडली आहे.

त्रिमूर्ती चौकात मेडिकल दुकान व स्वीट मार्टच्या दुकानासमोर दुचाकीवरून जाणार्‍या दोघा विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली. अपघातानंतर शेकडोने जमलेल्या नागरिकांकडून अतिक्रमणे व रस्त्यावर उभ्या राहणार्‍या वाहनांबाबत संताप व्यक्त केला गेला. या चौकात दररोज सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 12 ते 2, सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अंबड लिंकरोड, कामटवाडा, डीजीपनगर, औद्योगिक वसाहतीतून येणार्‍या दुचाकी, कार आणि ट्रक, बांधकाम साहित्याची वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांची वाहतूक होते. अपघातस्थळासमोरील स्वीट मार्टसह इतर दुकानांकडे येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्यातच उभी राहतात. दुकानदार स्वत:चे वाहन व साहित्य रस्त्यावर ठेवतात. एवढेच नव्हे, तर ग्राहकांच्या रांगा रस्त्यात येत असल्याने वाहनधारकांना रस्ता ओलांडणे मुश्कील होते. सायकलवरून जाणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना व पादचार्‍यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते.

होर्डिंग्जचा विळखा : अपघातानंतर गर्दी करणार्‍यांमध्ये लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते मोठय़ा संख्येने होते. अपघाताबाबत हळहळ व्यक्त करत त्यांनी पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच अवजड वाहने भरधाव वेगाने जातात, असा आरोप केला. मात्र, त्याचवेळी याच लोकप्रतिनिधींकडून मोठमोठे अनधिकृत होर्डिंग्ज त्रिमूर्ती चौकासह परिसरात उभारल्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला. पोलिस निरीक्षकांदेखत आरोप होऊनही त्यांनी बघ्याची भूमिका घेत होर्डिंग्ज, वाहतूक कोंडी हटविण्यात महापालिकाच अपयशी ठरत असल्याचे सांगून जबाबदारी झटकली. परंतु, वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या एका लोकप्रतिनिधीचे होर्डिंग दिसूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

लोकप्रतिनिधी उदासीन
अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनास्थळी स्थानिक नगरसेवक, विरोधी पक्षनेत्यांसह विविध राजकीय पक्षांची मंडळी हजर झाली. या बहुतांशी मंडळींनी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा साजरा केला; मात्र अशा वेळी एकाचीही रुग्णवाहिका मदतीला पुढे आली नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.