आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irregular Water Supply In Nashik City People Do Protest On Water Tank

मनसे रोष - पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने जलकुंभावर केले आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांसह जलकुंभावर आंदोलन केले. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने, हे आंदोलन म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी घरचा आहेरच ठरले.

पंचवटीच्या प्रभाग क्रमांक १ मधील म्हसरूळ गावठाणासह इतर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभास गळती लागल्याने परिसरात रोज पाणीपुरवठा विस्कळित होतो. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनदेखील अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नव्हती.
अखेर नगरसेवक गणेश चव्हाण यांनी परिसरातील नागरिकांसह म्हसरूळ परिसरातील जलकुंभावर आंदोलन केले.
१९८३ मध्ये उभारण्यात आलेल्या या जलकुंभातून सद्यस्थितीत म्हसरूळ गावठाण, मखमलाबाद, जुईनगर, वडजेनगर व कलानगर यांसह नववसाहतींनादेखील पाणीपुरवठा केला जातो. त्याची दुरवस्था झाल्याने जलकुंभाला गळती लागली आहे. परिणामी, गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असूनदेखील नागरिकांवर पाण्यासाठी रोजच वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यातून नगरसेवकांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. रविवारी काही नागरिकांनी नगरसेवकांना याबाबत जाब विचारला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कळवूनही दखल घेतली जात नसल्याने चव्हाण यांनी नागरिकांसह जलकुंभावर आंदोलन केले. त्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पंचवटीच्या बहुतांश भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेवक याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात, मात्र याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. जुन्या जलकुंभांना गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जाते. जलकंुभांच्या दुरुस्तीसाठी काही उपाययोजनाच केल्या जात नसल्याने लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.

या भागात पाणीप्रश्न
म्हसरूळ गावठाण, जुईनगर, कलानगर, गजपंथ, वडजेनगर, मखमलाबाद परिसर अादी परिसरात रोज कमी दाबाने व एकवेळ पाणीपुरवठा होतो.

जलकुंभाला गळती
म्हसरूळ गावात १९८३ मध्ये हा जलकुंभ बांधण्यात आला होता. पूर्वी नागरी वस्ती कमी होती. जलकुंभास गळती लागल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे.

..तर पुन्हा आंदोलन
जलकुंभाची गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. विभागाकडून केवळ ठेकेदारांना पोसण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चार ते पाच दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसे न झाल्यास अधिक उग्र आंदोलन केले जाईल. -गणेश चव्हाण, नगरसेवक, प्रभाग १