आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrelavant Practices Do For The Father Illness In Nashik

नाश‍कात वडिलांच्या आजारावर उपचारासाठी अघोरी कृत्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वडिलांच्या दुर्धर आजारावर उपचारासाठी अमावास्या असल्याने अघोरी उपचार करण्याचा प्रयत्न शेजारी राहणार्‍यांच्या दक्षतेमुळे देवळालीगावातील राजवाडा भागात गुरुवारी दुपारी उघडकीस आला. घरात खणलेला मोठा खड्डा, घरातील मुलांच्या कपाळावर लावलेले हळद-कुंकू, तेथे आढळलेली हाडे यामुळे या प्रकाराचे गूढ आणखीनच वाढले आहे. या प्रकरणी जादूटोणाविरोधी अध्यादेशानुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या अध्यादेशानुसार नांदेडपाठोपाठ राज्यात नोंदविण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे.


राजवाडा येथे बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत हा प्रकार सुरू होता. जितेश मोगल भालेराव, विजय मोगल भालेराव, सुनीता पाल, संगीता मोगल भालेराव हे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मोगल किसन भालेराव यांना अघोरी कृत्य, जादूटोणा, मांत्रिक उपचारांद्वारे बरे करण्यासाठी हा विधी करत होते, असे पोलिसांना आढळून आले. त्यासाठी
दुर्धर आजारावर उपचारासाठी भरवस्तीत अघोरी कृत्याचा प्रयत्न त्यांनी घरात चार ते पाच फूट खोल, 4 बाय 4 फूट आकाराचा खड्डा खणला होता. त्यावर टाकलेले ताईतही होते. या अघोरी कृत्यात घरातील लहान मुलांना सहभागी करून घेऊन त्यांच्या कपाळावी हळद-कुंकू लावण्यात आले होते. जवळच हळद-कुंकू, लिंबू, अगरबत्ती आदी पूजेचे साहित्य व हाडे मांडलेली होती.

शेजारच्यांना संशय : बाळासाहेब युवराज भालेराव (30) यांना बुधवारी रात्रीपासून मोगल किसन भालेराव यांच्या घरात खोदकाम सुरू असल्याच्या आवाजामुळे संशय आला. त्यांनी विचारणा केली असता जितेश याने फरशी बसवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. पहाटे पुन्हा खोदकामाचा आवाज आल्याने अघोरी कृत्याचा संशय बळावला. त्यामुळे गुरुवारी दुपारी बाळासाहेब भालेराव यांनी दरवाजा उघडण्यास सांगितल्यावर जितेशने तो उघडला. त्यावेळी खड्डा खणण्याचे कारण विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली.


परिसरात भीती : खड्डा पाहिल्यावर व त्यात हाडे व इतर अघोरी उपायांचे साहित्य आढळल्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. भरवस्तीत घडत असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील महिला व मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी घटनास्थळी रहिवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

शेजारच्यांनी या प्रकाराची माहिती कळवताच वरिष्ठ निरीक्षक मौला सय्यद, उपनिरीक्षक मच्छिंद्र केकाण, हवालदार दिनेश लवांड, अशोक साळवे व चंद्रकांत माळोदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घरात काळोख असल्याने बॅटरीच्या उजेडात घराची पाहणी केली. परिसरातील रहिवाशांची गर्दी, परिस्थिती लक्षात घेऊन घरातील चार लहान मुले, तीन महिला व एका पुरुषास सोबत घेऊन गेले. सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर रात्री राज्य शासनाने जारी केलेल्या जादूटोणाविरोधी अध्यादेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.