Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Is It Parshuram Or Nathuram,This Debate Rise By Board - Uttam Kamble

परशुराम असो की नथुराम, वादाला साहित्य महामंडळच जबाबदार - उत्तम कांबळे

अभिजित कुलकर्णी | Jan 10, 2013, 10:07 AM IST

  • परशुराम असो की नथुराम, वादाला साहित्य महामंडळच जबाबदार - उत्तम कांबळे

नाशिक - परशुराम असो की नथुराम.. साहित्य संमेलनातील अशा सगळ्या वादांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच थेट जबाबदार आहे. मात्र, कधी संमेलनाध्यक्ष तर कधी स्वागत समितीला पुढे करून महामंडळ नेहमीच नामानिराळे राहते. संमेलनाबाबतचे सर्वाधिकार महामंडळाकडेच एकवटले असून अध्यक्षपद म्हणजे शोभेचा गणपती झाला आहे.. असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

चिपळूण येथे 11 जानेवारीपासून होणाºया अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर निर्माण झालेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महामंडळाच्याकार्यशैलीवर तोफ डागली. संमेलनाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे सगळे अधिकार आणि अर्थातच जबाबदारी साहित्य महामंडळाची आहे. मी ज्या संमेलनाचा अध्यक्ष झालो त्या ठाण्याच्या संमेलनात नथुरामाच्या लेखावरून असाच गदारोळ उडाला. आताही निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्रावरून तोच प्रकार सुरू आहे; पण, गौरवग्रंथ असो, स्मरणिका असो की निमंत्रण पत्रिका, महामंडळच त्याला अंतिम स्वरूप देते. मग, इतरांना त्यासाठी जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

साहित्य संमेलन म्हणजे जणू एखादी जत्रा आहे, त्यामुळे तेथे ‘सब कुछ चलता है’ अशी मनोवृत्ती अलीकडे बळावत असून केवळ एखाद्या वादग्रस्त मुद्द्याभोवती संमेलन फिरत राहते. या विषयी सुद्धा साहित्य महामंडळाने गांभीर्याने विचार करायला हवा. तथापि, तसा तो होत नसल्याने त्याच्या उत्तरदायित्वाबाबत आता समाजानेच विचारणा करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. संमेलनाध्यक्ष निवडीचा सारा प्रकार म्हणजे ‘शहाण्यांची गावगुंडी’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या निमित्ताने कांबळे यांनी संमेलनाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबतच प्रश्न उपस्थित केले.

प्रक्रिया कालसुसंगत हवी- मुळात संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कालसुसंगत नाही. अद्यापही मतदान बहुतांशी टपालावर अवलंबून आहे. दरवर्षी नवे मतदार असल्याने आणि मतदान प्रक्रिया किचकट असल्याने हे काम दिवसेंदिवस खर्चिक बनत आहे. दशकभरापूर्वीची स्थिती अशी नव्हती. कारण त्यावेळी ‘आयडिआॅलॉजी’वर मतदान चालायचे. पण, आता एखाद्या वक्तव्यावर किंवा वाक्यावर निवडणूक इकडची तिकडे सरकते. अशा स्थितीत असामाजिक तत्वांचे फावते. आता सुद्धा परशुरामाच्या प्रकरणी तेच झाले आहे. असा ‘ट्रेंड’ पडणे योग्य नाही. कारण उद्या ठिकठिकाणची मंडळी आपापल्या भागातल्या पुराणपुरुषांची अस्मिता जागवण्यासाठी पुढे आली तर काय करणार, याचा विचार करायला हवा असे ते म्हणाले.

वास्तविक पाहता संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील मुद्द्यांकडे किती डोळसपणे पाहिले जाते, संमेलनात वर्षानुवर्षे जे ठराव होत आहेत त्यांचे पुढे काय होते, मराठी पुस्तकांच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, अशा अनेक विषयांवर महामंडळाने लक्ष केंद्रीत करायला हवे. पण, त्याऐवजी सगळ्यांचा दृष्टीकोन फक्त ‘चलता है’ असाच असल्याची खंत व्यक्त करताना आता लोकांनीच तशी विचारणा संबंधितांकडे करायला हवी, अशी अपेक्षा कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

वैचारिकता हरपली- संमेलनाध्यक्ष निवडताना दशकभरापूर्वी विचारधारा महत्त्वाची ठरायची. अलीकडे मात्र वैचारिकता हरपल्याने काही अजेंडाच उरलेला नाही. त्यापेक्षा सरपंचपदाच्या निवडणुकीचा अजेंडा बरा म्हणायला हवा.-
उत्तम कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष

Next Article

Recommended