आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेटाचा वाढता विस्तार, वाहतुकीवर भार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील वाहतूक बेटांचे सुशोभीकरणाच्या नावाखाली त्याचा विस्तारच अधिक होत असल्याने हे बेट वाहतुकीला अडथळे ठरत असल्याचे मायको सर्कलवरून दिसून येते. या चौकात रोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागतात. विशेष म्हणजे याच चौकात किमान चार-चार वाहतूक पोलिस नियुक्त असतानाही बेशिस्त वाहतूक नित्याचीच आहे.

मायको सर्कल चौकातून चारही दिशेला रस्ते जात असून याच ठिकाणी होलाराम कॉलनीकडे जाण्याच्या रस्त्याला ‘प्रवेश बंद’ करण्यात आला. सिडकोकडून मायको सर्कलकडे येणारी वाहने सरळ वाहतूक बेटाला ओलांडून चांडक सर्कल अथवा सीबीएसकडे जाता येते. मात्र, याच ठिकाणी डावीकडे प्रवेश नाकारण्यात आलेला असतानाही दुचाकीसह कार, मोटारी, रिक्षा सर्रास प्रवेश करीत असतात. चांडक सर्कलकडून येणारी वाहनेदेखील होलाराम कॉलनी, कॅनडा कॉर्नर, राका कॉलनी भागात जाण्यासाठी याच प्रवेश बंद असलेल्या मार्गावरून जातात. त्यामुळे त्र्यंबकरोडवरून येणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असते. या चौकात वाहतूक बेटाचा विस्तार अधिक असल्याने बसेस, ट्रक, कारला वळसा मारताना पूर्ण फेरी मारत असल्याने वेळही अधिक लागतो. त्यामुळे वाहनांची गती कमी होऊन वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर याच चौकाच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेल्स, हातगाडीवरील कपडे, फळे विक्रेते आणि चहाच्या टपर्‍यांवर येणार्‍या ग्राहकांची वाहनेदेखील रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहनांना अडसर निर्माण होतो.

त्र्यंबक रस्त्यावरचा मुख्य चौक
दररोज त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना मायको सर्कलमधूनच जावे लागते. या चौकातून एक रस्ता संचार भवन, उंटवाडी मार्गे सिडको आणि दुसरा रस्ता सातपूर, त्र्यंबकेश्वर व सीबीएसकडून त्र्यंबकेश्वर, सिडकोकडे जाणारा एक तिसरा रस्ता आणि सर्कलकडून चांडक सर्कलकडे जाणारा चौथा रस्ता. चारही रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागतात.