आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Commerce Embassy News In Marathi, Divya Marathi, Industrial Relation

इस्रायलचे वाणिज्यदूत आज शहरात, औद्योगिक संबंध होणार दृढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नेदरलॅण्डच्या वाणिज्यदूतांचे सल्लागार बी. बी. बन्सल यांच्या नाशिक भेटीनंतर बुधवारी (दि. 9) इस्रायलचे वाणिज्यदूत जोनाथन मिलर शिष्टमंडळासह शहरात येत आहेत. नाशिक व इस्रायल यांच्यातील औद्योगिक संबंध दृढ होण्यादृष्टीने हे पहिले पाऊल असून, इस्रायलमधील व्यावसायिक संधी, तसेच तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी मिलर निमा हाऊस उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.


भारत व इस्रायल यांच्यात सद्यस्थितीत सहा अब्ज डॉलरच्या व्यवसायाची उलाढाल सुरू असून, या व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी पावले उचलणे, तसेच उद्योजकांना याची माहिती देणे हा मिलर यांच्या भेटीमागील हेतू आहे. जिल्ह्यातील उद्योजकांना इस्रायलच्या औद्योगिक जगताच्या माहितीसोबतच तेथील आर्थिक बाबींची सविस्तर माहिती उद्योजकांना मिळणार आहे.


दुपारी 2.30 वाजता निमा हाऊस येथे ते उद्योजकांशी संवाद साधतील. जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा आदींनी केले आहे.


नाशिक-इस्रायलचा दुवा
अत्यल्प पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता येईल असे टिश्यू कल्चर, अन्नप्रक्रिया उद्योगांसारख्या बाबींमध्ये इस्रायली तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. नाशिक जिल्ह्याचा कृषी पतआराखडा देशात सर्वात मोठा असल्याने कृषी क्षेत्रात नाशिकचे महत्त्व अधोरेखित होते. द्राक्ष, डाळिंब, कांदा, कापूस, भात यांसारख्या पिकांसाठी नाशिक जिल्हा सुपरिचित असला तरी पाण्याचे नियोजन, अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी उद्योजक, प्रयोगशील शेतकर्‍यांना इस्रायल भेट महत्त्वाची वाटत आली आहे. आता इस्रायलनेही नाशिकला प्राधान्य दिल्याने ही देवाण-घेवाण व त्यातून व्यवसायवृद्धी साधण्यावर या भेटीत भर दिला जाण्याची शक्यता आहे.