आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एटीएम’मधूनच खाेट्या नाेटांचा पाऊस, बँक अधिकाऱ्यांचे कानावर हात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसेंदिवस बनावट नाेटांचे प्रस्थ वाढत चालल्यामुळे एकीकडे ग्राहक त्रस्त असताना, अशा नाेटा चक्क बँकेच्या एटीएममधूनही निघू लागल्याने ग्राहकांच्या ताेंडचे पाणी पळाले अाहे. विशेष म्हणजे, ‘चाेर तर चाेर वर शिरजाेर’ अशाच वृत्तीचाही अनुभव येत असून, बँकेकडून अशा नाेटांची जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ग्राहकालाच अाराेपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचा अनुभव स्वत: ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीलादेखील अाला. एरवी अशी नाेट अाढळल्यास बँक ती फाडून टाकत असल्याने ग्राहकाला माेठे नुकसान सहन करावे लागते, अाता मात्र एटीएममधूनच अशा नाेटा मिळत असल्याने अाणि दाद मागणाऱ्यांना बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे. त्यावर हा प्रकाशझाेत...

बँकेतूनतसेच एटीएममधून नकली नाेटा मिळण्याचे प्रकार धक्कादायक असून, याबाबत बँकेकडून मात्र उदासीनता दाखवली जात असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसाेय हाेत असल्याचे दिसून येत अाहे. एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या माेठी असताना अाता असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांची बँकांप्रति विश्वासार्हता कमी हाेऊ लागली अाहे. संबंधित प्रकाराबाबत ग्राहकांच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे अाल्या असतानाच, गुरुवारी स्वत: ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीलादेखील हा अनुभव अाला. त्याचा हा लाइव्ह रिपाेर्ट...

वेळ दुपारी १२.१४ वाजेची... क्रेडिट कार्डची रक्कम दुसऱ्या बँकेत भरावयाची होती. माझ्याकडे पैसे नसल्याने मोठ्या भावाच्या बँक खात्यातून पैसे काढून ते माझ्या बँक खात्यात भरावयाचे होते. भावाचे खाते बँक ऑफ बडाेदात आहे. त्यामुळे त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी मी आयटीआय सिग्नलवरील बडाेदा बँकेच्या पिंपळगाव शाखेच्या एटीएममध्ये गेलो. त्यातून हजार ५०० रुपयांची रक्कम मी काढली. बँक ऑफ बडाेदाच्या एटीएममधून पैसे काढल्याने त्यातून खोट्या नोटा येण्याचा प्रश्नच नाही. विश्वास ठेवून केवळ पैसे मी मोजून घेतले आणि घाईतच मी माझ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी गेलो. संबंधित बँकेच्या रोखपालाने माझ्याकडील सर्व नोटा घेतल्या. पण त्यातील ५०० रुपयांची एक नोट मला पुन्हा परत केली. मी त्याला विचारले असता त्याने ती नोट खोटी (फेक) असल्याचे सांगितले. मी पैसे बँक ऑफ बडाेदाच्या एटीएममधून काढल्याचे त्याला सांगितल्यानंतरही त्याने ती नाेट घेण्याचीच भूमिका कायम ठेवली. लागलीच त्या बँकेतून मी परत खातेदार माझ्या भावाला घेऊन बँक ऑफ बडाेदाच्या एटीएममध्ये गेलो. तेथे पैसे काढल्याची पावती शोधली. ती मिळाल्यानंतर लागलीच बँकेचे व्यवस्थापक गवळी यांना भेटलो. मात्र, वाईट अनुभव आला. अखेरीस ते चर्चा करण्यास तयार झाले. ‘एटीएममध्ये आम्ही खोट्या नोटा टाकतच नाहीत, शिवाय नोटा एटीएममध्ये टाकणारी एजन्सी वेगळी आहे. त्यांचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही’, असे माेघम उत्तर त्यांनी अाम्हाला दिले. त्यावर खातेदार माझा मोठा भाऊ आणि मी दोघेही ही खोटी नोट तुमच्या बँकेच्या एटीएममधून मिळाली. ती बदलून देण्याची जबाबदारी बँकेची असल्याचा हट्ट धरला. ‘पैसे एटीएममध्ये कोण जमा करते हे ग्राहक या नात्याने मला माहिती असण्याचे कारणच नव्हते. बँक ऑफ बडाेदा आणि तिचे जबाबदार पदाधिकारी म्हणून व्यवस्थापकांनाच आम्ही ओळखतो’, असे स्पष्ट माझ्या भावाने सुनावल्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जुन्या पोलिस आयुक्तालयासमोरील बँक ऑफ बडाेदा शाखेचे व्यवस्थापक राजेश वाघ यांना हा सर्व प्रकार सांगितला. वाघ यांनी गवळे यांना आम्हाला बँकेत पाठवण्याचा निरोप दिला. त्यानुसार आम्ही संबंधित बँकेत पोहोचलो. त्यांनीही प्रथम नोट कुठे, खातेदार कोण, त्यांचा खाते नंबर काय असे नानाविध प्रश्न विचारले. त्यानंतर लागलीच त्यांच्या सहकाऱ्याला बोलावून याबाबत विचारणा केली. संबंधित कर्मचाऱ्यानेही एटीएममध्ये पैसे भरणारी एजन्सी दुसरी असल्याचे सांगत त्यांना आम्ही संपर्क करून बघताे, असे उत्तर दिले. त्यांनी ती बदलून दिली तर अाम्ही तुम्हाला ती नाेट बदलून देऊ, असे सांगितले. त्यावर मी त्यांना विचारले की, आज मला बँकेत हप्ता येणार आहे, तेव्हा तुम्ही मला नोट केव्हा बदलून देणार? त्यावर संबंधित महोदयांनी दिल्यावरच मी नाेट देईल, असे उत्तर मिळाले. मी त्यांना म्हणालो, ‘अहो, मला हप्ता भरायचा आहे’. लागलीच त्यांनी पुन्हा उत्तर दिले की, मी एजन्सीकडे ही नोट पाठविणार आहे. ते देतील तेव्हाच ती तुम्हाला देणे शक्य आहे. बँकेच्या व्यवस्थापकांनीही त्यांना दुजाेरा दिला. विशेष म्हणजे, ‘खूप साऱ्या नोटा एटीएम मशीनमध्ये खोट्या टाकल्या जातात. वारंवार आम्ही त्यांना तक्रार केली आहे. पण, अनेकदा ते बँकेत भरणा झालेल्या नोटांमधूनच एटीएममध्ये पैसे टाकत असल्याने अशी अडचण येते’, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापकांनी दिली. आमच्याकडून एटीएमची पावती, खाते नंबर, मोबाइल क्रमांक आणि पाचशे रुपयांची नोटही घेतली. त्याच्या छायांकित प्रती आम्हाला दिल्या आणि संबंधितांकडून बदलून मिळाल्यास एक-दोन दिवसांत तुमच्या खात्यात पाचशे रुपये जमा केले जातील, असे अाश्वासन दिले.

सरतेशेवटी ‘एजन्सीने नाेट बदलून नाही दिली तर काय’, असा प्रश्न प्रतिनिधीने उपस्थित केल्यावर त्यांनी उत्तर देताच वेळ मारून नेली. अखेर बँकेवर विश्वास ठेवत अाम्ही तेथून निघालाे. मात्र, हप्ता भरण्यात उद‌्भवलेली ही समस्या अाणि पुन्हा अापले पैसे बदलून मिळणार की नाही, याबाबतची शंका मनात घर करून हाेती. एकूणच, बँक अाणि संबंधित एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे अशा कितीतरी लाेकांना येणारे हे अनुभव अडचणीत टाकत असतील, यात शंका नाही.

फाटक्या, चिकटवलेल्या नोटांमुळे होतात वाद
एटीएममशीन म्हटले की, कोऱ्या-करकरीत, कुठेही घडी पडलेल्या नोटा देणारे यंत्र, असा समज. पण आता त्याची विश्वासार्हता लयास गेली आहे. अगदी जुन्या, चुरगाळलेल्या नोटाही त्यातून मिळतात. एवढेच काय तर फाटलेल्या, चिकटवलेल्या नोटाही ग्राहकांना मिळाल्याच्या अनेक तक्रारी अाहेत.

हजारांच्या दहा नाेटा खाेट्या
गेल्या महिन्यात मी दहा हजारांची रक्कम मेरी परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममधून काढली. एक हजार रुपयांच्या दहा नोटा मिळाल्या. त्या सर्व नोटा बनावट निघाल्याने बाजारात कोणीही घेईना. मित्रांच्या सल्ल्यानुसार वैतागून मी त्या डिपॉझीटर मशीनमध्ये टाकल्या. तीन-चार मशीनने त्या स्वीकारल्याच नाहीत. पण एका मशीनने त्या स्वीकारल्यानंतर मला दिलासा मिळाला. -नीलेश बोरसे

बँक प्रशासन दाखविते ग्राहकांवर अविश्वास
केवळबँक ऑफ बडाेदा शाखेचीच ही समस्या नसून, जवळपास सर्वच बँकांचा हा अनुभव ग्राहकांना पावलोपावली येत आहे. मात्र, बँक त्यांच्यावर विश्वासच दाखवित नसल्याने त्यांचेच मोठे नुकसान झाल्याचेही काही ग्राहकांनी त्यांना आलेल्या अनुभवातून ‘डी. बी. स्टार’शी बोलताना सांगितले.

राेखपालाकडून खाेटी नाेट
मी एकानामांकित राष्ट्रीयीकृत बँकेतून पैसे काढले. रोखपालाने मला रक्कम दिली. मुद्दल अधिक असल्याने प्रत्येक नोट तपासली नाही. मी रुग्णालयात गेल्यावर त्यातील हजाराची एक नोट खाेटी असल्याचे समजले. मात्र, बँकेत गेल्यावर बँकेनेही ती परत घेण्यास नकार दिला. शेवटी सीसीटीव्ही फुटेज आणि सर्वच शक्यता तपासल्यानंतरच त्यांनी ३-४ तासांचा मोठा खल करून मला पैसे परत केले. -अमित येवला

एटीएममधून सर्वसाधारणपणे अत्यंत आवश्यकता असते, तेव्हाच पैसे काढले जातात. एटीएमवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची संख्याही अधिक अाहे. गुरुवारी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधींनाही तातडीने हप्ता भरावयाचा होता. त्यासाठी त्यांनी अगदी मोजकेच पैसे काढले. त्यांच्याकडे नंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी वेळ होता आणि खात्यात पैसेही होते, ही बाब वेगळी. मात्र, जेव्हा एखादा ग्राहक पैसे काढून रेल्वे अथवा बस प्रवासासाठी निघताे, रुग्णालयात बिल अदा करण्यासाठी किंवा तत्काळ अैाषधे घेण्यासाठी जाताे, तेव्हा त्याला एटीएमची नोट खोटी असल्यास प्रवास साेडावा लागला अथवा अाैषधच मिळाले नाही तर काय करणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत अाहेत.

खाते नसलेल्या व्यक्तीचे काय..?
प्रत्येकवेळी ग्राहक खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढेल याची खात्री नसते. अनेकदा इतर बँकेच्या एटीएममधूनही पैसे काढले जातात. अशा वेळी संबंधित व्यक्तीचे त्याच बँकेत खाते नसल्यास त्याने काय करायचे, असा मोठा प्रश्नही उपस्थित होतो.

रोखपालाकडूनही मिळतात बनावट नोटा
एटीएम तर सोडा, थेट बँकेच्या रोखपालाकडूनही बनावट नोटा मिळत असल्याचे अनुभव ग्राहकांना येऊ लागले अाहेत. बँकेवर विश्वास ठेवूनच केवळ पैसे मोजून घेत ग्राहक आलेली रक्कम खिशात घालतात. अनेकांना नोटा खऱ्या की खोट्या हे पटकन लक्षातही येत नाही. वृद्धांना तर अजिबातच समजून येत नाही. ज्यावेळी त्या नोटा इतर बँकेत अथवा अन्य ठिकाणी व्यवहारासाठी दिल्या जातात, तेव्हाच ती बनावट असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे, संबंधित बँक ती परत घेण्यास तीव्र विरोधच करते. त्यातून अनेकदा वादही झाल्याचेही काही ग्राहकांनी ‘डी. बी. स्टार’शी बोलताना सांगितले आहे.

एटीएममधील नोटांची विश्वासार्हता तरी काय?
बँकेत रोख रक्कम काढण्यासाठी गर्दी नको म्हणूनच बँकांनी त्यांच्या आणि ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम (ऑल टाइम मनी) ही संकल्पना राबवित तशी व्यवस्था केली आहे. बँकेच्याच आवारात पूर्वी एटीएमची व्यवस्था होती. पण आता नागरिकांचा राबता आणि त्या-त्या परिसराची गरज म्हणून बँकेची शाखा नसेल अशाही ठिकाणी, वर्दळीच्या ठिकाणी एटीएम बसविण्यात आले आहेत. मात्र, कालांतराने अाता या एटीएम मशीनमधून फाटक्या, बनावट नोटा निघत असल्याने या प्रकाराला जबाबदार कोण, अशा एटीएममधून मिळणाऱ्या नोटांची विश्वाससार्हता काय, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

थेट प्रश्न- अशोक चव्हाण, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक
- एटीएम मशीनमधूनचबनावट नोटा मिळत आहेत, कसे काय?
> तसे व्हायलाच नको. प्रत्यक्षात एटीएममध्ये पैसे टाकणारी वेगळी एजन्सी असते. या एजन्सीनेच त्यावर निर्णय घेतला पाहिजे.
- बनावट नोटाबाजारात येतात कशा? त्यावर कोणाचे नियंत्रण नाही का?
>बनावट नाेटा कुठून अाणि कशा येतात ते सांगणे मला शक्य नाही. पण त्यावर आरबीआयचे नियंत्रण आहे. एटीएम मशीमध्ये नाेटा टाकणाऱ्या एजन्सीनेही त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे अाहे.
- मला स्वत:लाचएटीएम मशीनमधून ५०० रुपयांची बनावट नोट मिळाली, पण ती बदलून मिळाली नाही.
> संबंधित बँकेत तुम्ही तक्रार करा. त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच त्याबाबत योग्य न्याय दिला जाईल.
- ग्राहकांना एटीएममधूनकिंवा बँकेतूनच बनावट नोट मिळाली तत्काळ लक्षात आली नाही, तर काय केले पाहिजे?
> ग्राहकांनी सतर्क राहावे. तक्रारीची भीती बाळगू नये. याबाबत उपाय काय हे आताच मला सांगता येणार नाही. पण याची सखोल माहिती घेऊन मी नक्कीच सांगू शकेल. तसे २६ ऑगस्ट राेजी बीवायके महाविद्यालयात आरबीआयने यासंदर्भात व्याख्यान ठेवले आहे. ग्राहकांनीही त्याला उपस्थित राहिल्यास याबाबत जनजागृती हाेईल.
बातम्या आणखी आहेत...