आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकाेट हल्ल्यानंतरही नियम धाब्यावर, बंदी झुगारून लष्करी गणवेशांची विक्री सुरुच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमध्ये अतिरेक्यांनी भारतीय लष्कराचे गणवेश परिधान करून दहशतवादी हल्ला केला. या घटनेनंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तातडीने देशभरात सामान्य नागरिकांनी सैन्यदलाचा गणवेश घालण्यावर बंदी अाणण्यात अाली, तसेच त्याच्या वापरावर संरक्षण मंत्रालयाकडून मर्यादा घालण्यात आल्या. मात्र, असे असतानादेखील देवळाली कॅम्प परिसरातील काही दुकानांमध्ये सर्रासपणे कुठल्याही विचारणेशिवाय सैन्यदलाच्या गणवेशासह इतर साहित्यही उपलब्ध करून दिले जात असल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रकाराकडे पाेलिस प्रशासनाकडून हाेणाऱ्या दुर्लक्षामुळे संवेदनशील शहराच्या सुरक्षा व्यवस्थेलाच खुले आव्हान दिले जात अाहे.
पठाणकोटयेथे नुकत्याच झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात दहशतवाद्यांनी लष्कराला हुलकावणी देण्यासाठी भारतीय सैन्यदलाचाच गणवेश परिधान करून सीमारेषेवरून घुसखोरी केली होती. सैन्यदलाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पंजाबमधील या सैन्यदल परिसरात याच कारणामुळे दहशतवाद्यांना यशस्वीपणे घुसखोरी करता अाली. त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने तातडीने सैन्यदलाच्या गणवेशाचा पुन्हा गैरवापर हाेऊ नये, यासाठी कुणीही सामान्य नागरिकाने हा गणवेश घालण्यावर तसेच दुकानांमध्ये परवानगीशिवाय याच्या व्रिकीवर बंदी घातली.

देशातील सैन्यदलाच्या दृ़ष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठिकाणांपैकी एक २४ तास सैन्यदलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वावर असणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरातील काही दुकानांमध्ये अाजघडीला सैन्यदलाचे गणवेश अन्य साहित्य विक्री केली जाते. काही विक्रेत्यांकडून अायकार्ड वा अन्य विचारपूस करूनच गणवेश विक्री केली जाते. मात्र, काही विक्रेत्यांकडून परवान्याशिवाय थेट सुरक्षा व्यवस्थेला अाव्हान देत सर्रासपणे लष्करी गणवेश, कापड वा अन्य साधनांची विक्री केली जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले अाहे. अगदी ३०० ते ८०० रुपयांपर्यंत हवे त्या प्रमाणात कोणत्याही अडचणीशिवाय कापड वा गणवेश या ठिकाणी उपलब्ध हाेत अाहे. विशेष म्हणजे, ‘तुम्ही फक्त काय पाहिजे सांगा, सैन्यदलाचे सर्व साहित्य येथे सहज मिळेल’ असेही काही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. शहरातील रामकुंड, काळाराम मंदिर यांसह अन्य धार्मिक स्थळांसह नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह, रेल्वेस्थानक यांसह देवळाली कॅम्प या लष्करी ठिकाणांमुळे नाशिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असतानाही अशा प्रकारांमुळे शहराची सुरक्षिततादेखील धाेक्यात येऊ शकते. त्यामुळे पाेलिस प्रशासनाने संबंधित प्रकाराकडे दुर्लक्ष करून चालणारे नसून, शहरातील अशा नियमबाह्य विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे अाहे.
सुरक्षारक्षकांसाठी हाेताेय गणवेश म्हणून वापर...
शहरातील अनेक सुरक्षारक्षक एजन्सीधारकांकडून सुरक्षारक्षकांसाठी गणवेश म्हणून सैन्यदलाचाच गणवेश वापरला जात असल्याची बाबही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या मुद्याकडे प्रशासन मात्र साफ दुर्लक्ष करीत असून, पुन्हा या गणवेशांचा गैरवापर झाल्यास त्याला जबाबदार काेण, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित हाेत अाहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, का आहे धोक्याचे...
- पुढील स्लाइड्सवर वाचा, पाेलिसउपायुक्तांना थेट प्रश्न... काय म्हणतात पाेलिसउपायुक्त...