आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड येथील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी नाल्यात; पिके जळाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी उघड्या नाल्यात सोडले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून, त्यामुळे नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. थेट विहिरीत हे धोकादायक रासायनिक पाणी झिरपत असून, शेतीतील उभी पिके जळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिल्या जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीचे चित्र वास्तवात मात्र भयावह आहे. नियमांची पायमल्ली करत कंपन्यांनी आरोग्याचा प्रश्न गंभीर केला आहे. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे काणाडोळा करताना दिसत आहे. कंपन्यांमधील सांडपाणी थेट उघड्या नाल्यात सोडले जात आहे. हेच पाणी परिसरातील १० किलोमीटर भागात झिरपते. त्यामुळे आजूबाजूच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या विहिरीत रासायनिक पाणी येत आहे. या पाण्यामुळे पिके जळाली आहेत. सांडपाण्याच्यानियमांची पायमल्ली कोणत्याहीकंपनीला रासायनिक सांडपाणी असे उघड्यावर सोडता येत नाही. त्यासाठी कंपनीतच सांडपाणी शुद्धीकरण यंत्र असावे, असा नियम आहे. मात्र अनेक कंपन्यांकडे ही यंत्रणाच नसल्याने ते हे पाणी नाल्यातून सोडतात. त्यामुळे दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठे गेले?
हेसारे सुरू असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठे गेले? नियम असे पायदळी तुडविले जात असताना महापालिका एमआयडीचे अधिकारी काय करतात? प्रशासनालाच याबाबत गांभीर्य दिसत नाही. -गोकुळ दातीर, नागरिक,अंबड

रासायनिक पाणी धोकादायक
कंपन्या रासायनिक सांडपाणी थेट उघड्या नाल्यात सोडतात. यामुळे आमची पिके जळाली आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनदिक्कत सुरू आहे. - शांताराम फडोळ, शेतकरी,अंबड

न्याय कुठे मागायचा?
रासायनिक सांडपाण्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. यापूर्वी जमिनी गेल्या. उरलेल्या जमिनीत शेती करावी तर पिके जळाली. आता न्याय कुणाकडे मागायचा? - साहेबराव दातीर

पावसाळी नाले झाले गायब
औद्योगिक वसाहतीत अनेक नैसर्गिक नाले आहेत. मात्र ते गायब झाले आहेत. मनपा एमआयडीसीतर्फे या नाल्यांची वर्षानुवर्षे सफाई झाल्याने नाले बुजले आहेत. यामुळे हे पाणी कधी-कधी थेट रस्त्यावरून वाहते. यामुळे डास, दुर्गंधीचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागतो.

अंबड अाैद्याेगिक वसाहतीत पाहणी करताना अायमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सचिव उन्मेष कुलकर्णी, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, एमअायडीसीचे सुपरिटेंडेंट इंजिनिअर नितीन वानखेडे, पी. अार. बंडाेपिया अादी.
बातम्या आणखी आहेत...