आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकार्पणा अभावी महिला हेल्पलाइनची फरपट, १८१ हेल्पलाइन वर्षभरातच ‘डिसकनेक्ट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दिल्लीतील निर्भया घटनेनंतर महिला बालविकास विभागामार्फत महिलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात अालेली १८१ ही दूरध्वनी हेल्पलाइन वर्षभरातच ‘डिसकनेक्ट’ झाली अाहे. या हेल्पलाइनवर काॅल केला असता ‘अापला काॅल अामच्यासाठी महत्त्वाचा अाहे, कृपया लाइनवर राहा’ एवढाच आवाज ऐकू येतो. परंतु त्यापुढे हा काॅल सरकतच नसल्याने पीडिता ‘हेल्पलेस’ हाेते. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण राहिले असल्याने ही हेल्पलाइन मध्येच बंद करण्यात अाल्याची चर्चा आहे.

निर्भया प्रकरणानंतर महिला अाणि बालविकास विभागा मार्फत एप्रिल २०१५ ला ही हेल्पलाइन प्रत्यक्षात सुरू झाली. ही हेल्पलाइन केवळ माहिती देणारी नसेल तर प्रश्न साेडविणारीही असेल, अशी रचना करण्यात अाली. परंतु अत्यावश्यक सेवांची अद्ययावत माहितीच महिला बालविकास विभागाला बऱ्याच काळापर्यंत उपलब्ध झाली नाही. शिवाय अनेक ठिकाणी समुपदेशक तत्सम कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात अाली नाहीत. मात्र, अशा अर्धवट अवस्थेतच ती सुरू करण्यात अाली.

हेल्पलाइन सुरू करण्यापूर्वी याचा जितका गाजावाजा झाला तेवढा ती सुरू झाल्यानंतर झाला नाही. परिणामी प्रारंभीच्या काळात अपेक्षेपेक्षा कमी काॅल अाले. परंतु त्यापैकी बहुसंख्य काॅल्स गंभीर स्वरुपाचे हाेते. बलात्कार, छेडछाड, काैटुंबिक अत्याचार कार्यालयीन लैंगिक छळापर्यंतची प्रकरणे यातून पुढे अाली. त्यातील काही प्रकरणांच्या मुळाशी जाऊन पिडितेला दिलासादेखील देण्यात अाला. मात्र, त्यानंतर या हेल्पलाइनकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. काॅल्सची संख्या कमी असल्याचे कारण दाखवत समुपदेशकांची भरती थांबविण्यात अाली . गेल्या काही दिवसांपासून तर हेल्पलाइन बंद अवस्थेत अाहे. त्यावर काेणी काॅल केल्यास हिंदी, मराठी अाणि इंग्रजी भाषेचे पर्याय विचारले जातात. या पर्यायांपैकी एकाची निवड केल्यावर अापला काॅल अामच्यासाठी महत्वाचा अाहे’ असे सांगत धून वाजविली जाते. त्यानंतर दीर्घकाळ हे रेकाॅर्डिंग वाजत राहाते.

दाेनअधिकाऱ्यांची वेगवेगळी माहिती : यासंदर्भात महिला बालविकास विभागाचे राज्याचे उपायुक्त डी. व्ही. देसावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेल्पलाईन सुरू असल्याची माहिती दिली. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने हेल्पलाइन बंद असल्याचे सांगताच ‘उद्या याची माहिती घेताे’, असे सांगत त्यांनी वेळ मारुन नेली. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने मात्र नाव प्रसिध्द करण्याच्या अटीवर हेल्पलाइन प्रायाेगिक तत्वावर सुरू करण्यात अाली हाेती, अशी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही हेल्पलाइन असल्याने त्यांच्या हस्ते लाेकार्पण झाल्यानंतरच ती सुरू हाेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच महिलांच्या समस्या साेडविण्यासाठी अतिशय अादर्शवत ठरणारी हेल्पलाइनची ही याेजना केवळ लाेकार्पणाअभावी रखडली असल्याचे निदर्शनास येत अाहे.

प्रसिद्धी अभावी अपेक्षित प्रतिसाद नाही
हेल्पलाइनमध्ये सुरुवातीच्या काळात कार्यरत काही समुपदेशकांशी चर्चा केली असता, प्रसिध्दीअभावी काॅल्सची संख्या प्रारंभीच्या काळात अतिशय मर्यादित हाेती, असे सांगण्यात अाले. मात्र सामाजिक सर्वेक्षणानुसार अशा हेल्पलाइनची महिला वर्गाला नितांत गरज असल्याचेही पुढे अाल्याचे त्यांनी सांगितले. याेग्य व्यवस्थापन नियाेजन असल्यास या हेल्पलाइनला अभूतपुर्व प्रतिसाद मिळू शकताे असेही संबंधितांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...