आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाह - ठाकरे बंधू यांच्यात ध्वजारोहण सोहळ्यात जुगलबंदीची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुरोहित संघाने आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात लोकप्रतिनिधींचा झालेला अवमान यजमान असलेल्या महापालिकेला डावलण्याचा झालेला प्रयत्न लक्षात घेत महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी १९ आगस्ट रोजी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्याची सूत्रे हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौरांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली असून, या बैठकीचे विशेष म्हणजे एकाच व्यासपीठावर सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसे झाले तर, भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जुगलबंदी होण्याची शक्यता आहे.

१४ जुलै रोजी रामकुंड येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावरून चांगलेच राजकीय वादळ निर्माण झाले होते. पुरोहित संघ, पोलिस, जिल्हा प्रशासन महापालिका यांच्यातील असमन्वयामुळे अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधींना ध्वजारोहण सोहळ्यापासून वंचित राहावे लागले. पोलिसांकडून प्रवेशासाठी मज्जाव केल्यामुळे चांगलीच वादावादी झाली. विशेष म्हणजे भाजपमधील विशिष्ट नेते वगळता सर्वांनाच प्रवेश नाकारल्यामुळे या निमित्ताने शिवसेनेसह विरोधकांनी एकीही केली होती. महासभेत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी लक्षवेधी उपस्थित करून मानपानावर चर्चा घडवून अाणली. महापाौरांसह प्रमुखांचा झालेला अवमान क्लेषदायी असल्याचा एकमुखाने उच्चार करीत शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासाठी किमान सर्वांचा मानापमान जपावा या संस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी दिली जावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेता सलीम शेख, विरोधी पक्षनेता कविता कर्डक, गटनेता अजय बोरस्ते, अनिल मटाले, संभाजी मोरुस्कर, संजय चव्हाण यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी महापालिकेने यजमान होऊन संपूर्ण नियोजन सोहळ्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलावी, अशी चर्चा झाल्याचे समजते. तसेच सर्वच पक्षाच्या अध्यक्षांना आमंत्रण देऊन सन्मानाने व्यासपीठावर स्थान देण्याचाही निर्णय झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार सर्वच पक्ष प्रमुखांना आमंत्रणही धाडले जाणार आहे.

राष्ट्रवादीकडून भुजबळ तर काँग्रेसकडून शोध सुरू
राष्ट्रवादीकडूनमाजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार आहे. काँग्रेसकडून अद्याप कोणाला आमंत्रित करावे, याबाबत महापालिकेला नाव निश्चित करून मिळाले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांना निमंत्रण दिले जाण्याची शक्यता असून, त्यांच्याबरोबर संपर्कमंत्री म्हणून काम केलेले बाळासाहेब थोरात यांनाही बोलावण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधूंच्या उपस्थितीविषयी संभ्रम
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संबंध फारसे मधुर नसल्याचे अनेक वेळा दिसून आले. शाह यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले जाते. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच कुंभमेळ्याच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये येईन, मात्र सोहळ्यात न सामील होता दुरून कोठून तरी साक्षीदार होईल, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची अनुपस्थितीचीच शक्यता अधिक आहे.
बातम्या आणखी आहेत...