आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक भूखंडांचा पुनर्लिलाव करण्यात यावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एमआयडीसीने सिन्नर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींतील जवळपास 75 व्यावसायिक भूखंडांची लिलाव प्रक्रिया पार पाडली आहे. या भूखंडांकरिता लावण्यात आलेल्या बोलींचा अहवाल मुख्यालयाकडे लवकरच पाठविण्यात येणार असून, या प्रक्रियेबाबत तरतूद असताना कोणत्याही उद्योजक संघटनांना त्याची माहिती देण्यात आली नाही. यामुळे एमआयडीसीचेही आर्थिक नुकसान झाले आहे. ज्यांनी एमआयडीसीकडे यापूर्वी भूखंड मिळावेत याकरिता अर्ज दाखल केले आहेत, त्यांना प्राधान्याने भूखंड देण्यात यावेत, अशी मागणी नाशिक इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (निमा) केली आहे.

निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष समीर पटवा, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, अंबड इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी यांसह महापालिकेचे सभागृहनेते शशिकांत जाधव यांसह पदाधिकार्‍यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन या प्रक्रियेचा निषेध करीत असल्याचे निवेदन दिले.

प्रक्रियेची माहिती दडपली

उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील जवळपास 15, तर सिन्नर औद्योगिक वसाहतीतील 63 व्यावसायिक भूखंडांची प्रक्रिया एमआयडीसीने राबविली आहे. या प्रक्रियेची माहिती उद्योजक संघटनांना देणे गरजेचे असतानाही ती जाणीवपूर्वक दडपण्यात आली. एकाच वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आल्याने याची माहितीही उद्योजकांपर्यंत पोहोचू शकली नाही, यामुळे या प्रक्रियेविषयी उद्योजक पूर्णत: अनभिज्ञ राहिले. ज्यांनी यापूर्वी भूखंडांकरिता अर्ज केले आहेत आणि लिलाव प्रक्रियेची वाट पाहत आहेत, त्यांना प्राधान्याने हे भूखंड देण्यात यावे, अशी मागणी निमा पदाधिकार्‍यांनी केली आहे. निमाच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या या मागणीवर एमआयडीसीकडून काय पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.