नाशिक- आयटी बिल्डिंगकरिता ग्राहक मिळवून देण्यासाठी थेट उद्योजक संघटनांना गळ घालण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे. पुनर्निविदा काढूनही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्याने ही वेळ आल्याचे स्पष्ट झाले असून, केवळ एमआयडीसीच्या संकेतस्थळावरच निविदा प्रकाशित केल्याने अनेकांपर्यंत या निविदेबाबत माहितीच पोहोचली नसल्याची चर्चा आहे. आता या निविदांना दहा दिवसांची मुदतवाढ देण्याची नामुष्की एमआयडीसीवर ओढावल्याचे समोर आले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील आयटी बिल्डिंगला गेल्या एक तपापासून ग्राहकांची प्रतीक्षा आहे. मागीलवर्षी एमआयडीसीने या इमारतीकरता निविदा काढल्या होत्या.
मात्र, दर जास्त असल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून, इमारतीचा उद्देश बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप उद्योजकांनी केला होता. या इमारतीकरता फेरनिविदा काढाव्यात आणि उद्देश बदलला जाऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. त्यानुसार पुन्हा निविदा काढण्याचे त्यांनी मान्य केले होते.
यानंतर दुस-यांनदा निविदा काढण्यात आल्या असल्या, तरी त्याबाबत प्रचंड गोपनीयता पाळली गेली आणि अधिक प्रसिद्धी देण्याची गरज असतानाही या निविदा केवळ एमआयडीसीच्या संकेतस्थळावरच प्रकाशित करण्यात आल्या, उद्योजक संघटनांनाही याची माहिती एमआयडीसीने दिली नाही. यामुळेच निविदांचा कालावधी मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूनही ग्राहकांचा प्रतिसाद मिळालेला नाही.