आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयटी’च्या आगमनाची घंटा, करील स्थलांतराला टाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आयटी उद्योग आल्यास शहराचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच अभियांत्रिकी, व्यवस्थापनासह अन्य पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबू शकणार आहे.

सध्या वर्षाला सुमारे 31 हजार तरुण शहरात या प्रकारचे शिक्षण पूर्ण करीत असले तरी स्थानिक पातळीवर चांगल्या नोकरीच्या संधी अतिशय र्मयादित असल्यामुळे आकर्षक वेतनाच्या अपेक्षेने त्यातील सुमारे 75 टक्के पुणे-मुंबईसह परराज्यातील बंगळुरूसारख्या महानगरांची वाट धरतात. माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या आगमनाने त्यांना शहरातच चांगले पॅकेज आणि मनाजोगती नोकरी मिळू शकते.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (निमा) 27 जुलैला ‘नाशिक - नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन’ या विषयावर देश पातळीवरील परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी जवळपास दीडशे आयटी कंपन्यांना आमंत्रित केले असून, त्यांच्यासमोर शहराचे सादरीकरण करण्यात येणार आहे. नामांकित आयटी कंपन्यांनी नाशिकमध्ये उद्योग सुरू करावा, अशी गळ परिषदेच्या निमित्ताने घातली जात असून काही कंपन्यांनी शहरात उद्योग सुरू करण्यास सहमतीही दर्शवली आहे. हे उद्योग सुरू होण्याबाबतची घोषणा 27 जुलैलाच होणार असून नाशिकच्या ललाटीचे भाग्य बदलण्याची क्षमता त्यात दडली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


नाशिकमध्ये आहे कौशल्याची खाण
शहरात प्रतिवर्षी व्यवस्थापनाचे 2 हजार, अभियांत्रिकीचे 9 हजार, तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारे सुमारे 20 हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतात. आयटी व आयटी संलग्न उद्योगांसाठी हार्डवेअर-सॉफ्टवेअर अभियंते, व्यवस्थापन आणि बीपीओसाठी पदवीचे शिक्षणही पुरेसे ठरते. त्यामुळे आयटी उद्योगाची ही गरज नाशिकमध्येच भागवता येणे शक्य आहे.

एक उद्योग, दोन हजार रोजगार
इएसडीएस, डाटामॅट्रिक्स, डब्ल्यूएनएस, अनंत अँक्सेस यासारख्या काही आयटी कंपन्या शहरात कार्यरत असून तेथे किमान नऊ हजारावर कर्मचारी आहेत. अगदी दोनशेपासून अडीच हजार कर्मचार्‍यांच्या बळावर चालणार्‍या या कंपन्या आहेत. एक मध्यम स्वरूपाचा आयटी उद्योग शहरात आला तरी किमान दोन हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.