आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'IT' S Bright Future, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदलत्या जीवनशैलीमुळे ‘आयटी’चे भविष्य उज्ज्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बदलणा-या जीवनशैलीमुळे विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आयटी क्षेत्राची मागणी मोठी राहणार असल्याने या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून, त्याला पूरक उत्पादनांच्या निर्मिती आणि व्यवसायाला मोठी बाजारपेठ असल्याचे प्रतिपादन इन्फोसिस कंपनीचे उपाध्यक्ष आणि भारतीय बिझनेस युनिटचे प्रमुख सी. एन. रघुपती यांनी केले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आयोजित ‘आयटी एक्स्पो’च्या उद्घाटनप्रसंगी रघुपती बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर नॅसकॉमचे प्रादेशिक व्यवस्थापक परेश दिघावकर, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक नरेंद्र गोलिया, इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी, निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, क्लस्टरचे सीईओ हर्षवर्धन गुणे उपस्थित होते.

आयटीसोबतच पूरक उद्योग असतील तर शहराचा विकास वेगाने होतो. बंगळुरूच्या तुलनेत अशा उद्योग आणि सेवांचे प्रमाण नाशिकमध्ये अधिक असल्याचे रघुपती यांनी सांगितले. सिलिकॉन व्हॅली विकसित झाली त्याला हीच कारणे कारणीभूत होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भविष्यात स्मार्ट वर्क, स्मार्ट होम, स्मार्ट ट्रान्सपोर्ट यात आयटीमुळे होत असलेले बदल अधिक वेगाने होणार असून, त्याचाच फायदा आयटी क्षेत्राच्या विकासाला कारणीभूत ठरेल, असे ते म्हणाले.
जगाचा विचार केल्यास आर्थिक ताकदीचे केंद्र बदलत चालले असून, विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे ते केंद्र सरकत आहे, अशा स्थितीत भारताकडे असलेली तरुण लोकसंख्या आणि बौद्धिक संपदेमुळे आपली प्रगती निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2020 पर्यंत जगातील सर्वात तरुण आणि कुशल लोकसंख्या भारताची असेल, याकडे लक्ष वेधताना, 2011-31 या वीस वर्षांत जगाच्या जीडीपीचा विचार करता भारताचा जीडीपी 7.4 इतका सर्वाधिक असेल, तर जगाचा एकूण जीडीपी 4.2 टक्के असेल, असे रघुपती यांनी सांगितले.

पुण्यात आयटी आल्यानंतर 15-20 वर्षांतच पुण्याचा चेहरामोहरा बदलला, आर्थिक सक्षमता वाढली, पहिल्या टप्प्यात पुणे, बंगळुरूसारखी शहरे आणि आता त्यांची क्षमता संपल्यानंतर इतर शहरांचाही या उद्योगासाठी विचार होऊ लागल्याने ‘नाशिक नवे आयटी डेस्टिनेशन’ म्हणून आकर्षित करू लागल्याचे नॅसकॉमचे परेश दिघावकर या वेळी म्हणाले.

नाशिकमधून दरवर्षी दहा हजारांपेक्षा जास्त इंजिनिअर्स बाहेर पडतात, गुगलसारख्या कंपन्यांशी नाशिकच्या युवकांची भागीदारी आणि येथील वातावरण, कौशल्य, उद्योजकता, विश्वासू नागरिक ही या शहराची बलस्थाने असून, येथे इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यांनी यावे, असे आवाहन पीयूष सोमाणी यांनी या वेळी केले. नरेंद्र गोलिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मनीष कोठारी यांनीही मोठ्या कंपन्यांनी नाशिकमध्ये येण्याचे
आवाहन केले.