आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातींचे स्वतंत्र माेर्चे निघणे ही शाेकांतिकाच - नागराज मंजुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेपर्डी येथील बलात्काराच्या घटनेनंतर माेठ्या प्रमाणात माेर्चे निघत अाहेत. यापूर्वीदेखील विविध समाजाकडून असे माेर्चे निघत हाेते. प्रगत समाजात जातींचे असे स्वतंत्र माेर्चे निघणे ही शाेकांतिकाच अाहे. बलात्कार करणारा एक नराधम असताे. त्याला कुठली जात नसते. धर्म नसताे. त्यामुळे त्याने केलेल्या हिंसक कृतीचा निषेध व्हायला हवा. ना की त्याच्या जातीचा, असे मत ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

महानायक डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब अांबेडकर विचार संमेलन कर्मवीर रावसाहेब थाेरात सभागृहात झाले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मंजुळे बाेलत हाेते. काेपर्डी प्रकरणातील पीडित मुलीला न्याय मिळणे अावश्यक अाहे, असे सांगत मंजुळे म्हणाले की, दलितांवर अन्याय झाला की दलित एकत्र येतात आणि मराठ्यावर अन्याय झाला की मराठा समाज एकत्र येताे. हे एकाकीपणाचे लक्षण आहे. सर्वांनी एकत्र येऊन यावर चर्चा केली पाहिजे.समाजात हिंसा करता जगता अाले पाहिजे. अाजकाल महापुरुषांच्या पुतळापूजनाला महत्त्व अाले अाहे. वास्तविक, असे पुतळे एकटेच असतात. ते कधीच काही करत नाही. अशा प्रतीकांमध्ये अडकण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांची पूजा हाेणे अावश्यक ठरते. ‘सैराट’ चित्रपट हा एक विचार हाेता, असेही त्यांनी नमूद केले.

‘झिंगाट’ नाचण्यापेक्षा क्लब बरा
अाजकालजयंती, सण, उत्सव जाेरदार साजरे करण्याची पद्धत रूढ झाली अाहे. तुमच्या अानंदाचा दुसऱ्यांना त्रास हाेताे, याचा काेणी विचारच करीत नाही. जसे सिगारेट पिणाऱ्याला तत्कालीन अानंद हाेतही असेल. परंतु, त्याच्या धुराचा त्रास समाजातील इतर अनेकांना हाेतो. त्यामुळे सार्वजनिक मिरवणुकांमध्ये ‘झिंगाट’ नाचण्याची गरज नाही. त्या तुलनेत क्लब संस्कृती वाईट नाही. कारण क्लबमध्ये नाचणाऱ्यांचा त्रास समाजाला हाेत नाही, असेही मंजुळे यांनी या वेळी विशद केले.

अारक्षणात जात नकाेच : अॅड. प्रकाश अांबेडकर : भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेडकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, समाजव्यवस्थेतून गाेंधळ उडत असल्याने नव्या पिढीसमाेर माेठा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. इंडियन की हिंदू माइंड अशा द्वंद्वात ताे अडकत अाहे. अशा परिस्थितीत त्याला वेगवेगळ्या संस्कृती, भाषा, व्यवस्था अापल्या वाटायला लागतात. समाजात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत अाहे. हिंसक पद्धतीने माणसे एकमेकांवर अधिकार गाजवायचा प्रयत्न करीत अाहे. धर्माला अवास्तव महत्त्व अाल्याने त्यात नवीन पिढी अडकत अाहे. खरे तर धर्माची चिकित्सा हाेत नाही, हे अपयशामागचे कारण अाहे. व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवणारी व्यवस्था काेणती, यालाही महत्त्व अाहे. अाज खासगीकरण वा सरकारीकरणाचेच पर्याय समाेर ठेवले जात अाहे. या बाबी सहजीवनाचा भाग हाेणार का, याचाही विचार व्हावा. अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही परकीयांची अाक्रमणे वाढली अाहेत. निर्णयप्रक्रियेत जनतेला सामावून घेण्याची वृत्ती कमी झाली अाहे. म्हणूनच डाॅ. अांबेडकरांनी म्हटले हाेते की, काही निर्णय घेताना शासनाला मर्यादा असायला हव्या. खरे तर नवीन व्यवस्थेची, विचारसरणीची बांधणी करणे अावश्यक अाहे. अन्यथा, विचार लादण्याची प्रवृत्ती वाढेल अाणि लाेकं धर्मवेडे बनतील. अशा परिस्थितीत घर वापसी हा भारतीयांसमाेरचा मुद्दा असेल. तरुण पिढी ही स्वत:च्या विकासाच्या दृष्टीने माेठ्या प्रमाणात धावते. खरे तर राखीव जागा हे विकासाचे द्याेतक नाही, तर विकासाची खात्री देणारी व्यवस्था अाहे. म्हणून अांबेडकरी चळवळीतील सर्वात माेठे अाव्हान हेच अाहे की, अामचे विकासाचे प्रारूप कसे असेल, याची मांडणी करणे महत्त्वाचे अाहे. त्यात माणूस हा केंद्रबिंदू असायला हवा. अारक्षणात वा विकासात जात असता कामा नये, तर त्यात व्यक्तिकेंद्र मानून विकसित करणे बाबासाहेबांना अपेक्षित हाेते, असेही त्यांनी नमूद केले.

पालिका निवडणुकीपूर्वी सरकार पडेल : अॅट्रॉसिटीची चर्चा सध्या होत असून, यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात राजकारण दडलेले आहे, असा दावा अॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी सध्याचे सरकार पडू शकते, त्यामुळे आपला प्रभाव वाढवण्यासाठी मोर्चाच्या माध्यमाचा उपयोग केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी यांनी भूमिका मांडताना सांगितले की, नवी पिढी लेखनाकडे वळत असून, ती साहित्याचा गांभीर्याने विचार करू लागली अाहे. डाॅ. अांबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी अशी संमेलने अावश्यक अाहेत. ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी डाॅ. अांबेडकर यांचे विचार सर्वच समाजासाठी विशेषत: महिलांसाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले.यावेळी स्वागताध्यक्ष डाॅ. मनीषा जगताप यांनी मनाेगत व्यक्त केले. व्यासपीठावर डाॅ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित हाेते. राजू देसले यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. हेमलता पाटील यांनी अाभार मानले.
दरम्यान, संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, जगातला प्रत्येक देश हा कष्टकरी वर्गाने घडवलेला आहे. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांनीच देश टिकवला आहे. देश फोडण्याचे आणि विकण्याचे काम वरच्या वर्गातल्या लोकांनी केले. हे अगदी खरे आहे की, ब्राह्मण आणि क्षत्रियांनी देश विकला, असे परखड मत डॉ. कसबे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब अांबेडकर विचारमंच संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. रावसाहेब कसबे, अॅड. प्रकाश आंबेडकर, ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. हेमलता पाटील, स्वागताध्यक्षा डॉ. मनीषा जगताप.
बातम्या आणखी आहेत...