आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे कसले ट्रान्सफॉर्मर हे तर ‘त्रास’फॉर्मर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी स्क्ूलजवळ असलेल्या मोरया पार्कमधील रो-हाउसेसच्या भिंतीलगतच वीज कंपनीने ट्रान्सफॉर्मर उभारला आहे. हा ट्रान्सफॉर्मर अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने परिसरातील अनेक कुटुंबांच्या जिवालादेखील धोका निर्माण झाला आहे. ट्रान्सफॉर्मरची अवस्थादेखील अत्यंत बिकट असून, त्याच्यालगतच जलवाहिनीदेखील असल्याने पाण्यात वीजप्रवाह उतरून एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल परिसरातील संतप्त रहिवाशांनी केला आहे.

सोसायटीच्या कुंपनाला लागूनच उभारलेला हा ट्रान्सफॉर्मर तेथून हटवावा, यासाठी स्थानिक नागरिकांनी वीज कंपनीच्या पंचवटी कार्यालयापासून खरबंदा पार्क ते विभागीय अभियंत्यांपर्यंत खेटे मारले. त्यावर बसवलेला ट्रान्सफॉर्मर हा चुकीच्या जागी बसवला असल्याचे वीज कंपनीनेदेखील मान्य केले आहे. परंतु, संबंधित बांधकाम व्यावसायिकाची चूक असल्याचे सांगत तो हटविण्यास असमर्थता दर्शवली. मात्र, त्यासाठीचा सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च दिल्यास ट्रान्सफॉर्मर हटवून दुसरीकडे बसविण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे.

या ट्रान्सफॉर्मरला लागून असलेल्या तीन रो-हाउसेससह सुमारे तब्बल वीसहून अधिक कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यातून निर्माण झालेला आहे. ही बाब मंडळाच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही आणि त्याबाबतची चूक तोंडी मान्य करूनही दुर्घटना घडल्याशिवाय काहीच हालचाल करायचीच नाही, अशाच पद्धतीने कामकाज सुरू असल्याने परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
..तर जबाबदार कोण?
^याप्रश्नी बिल्डरची चूक असल्याचे सांगत बोळवण केली जाते. संबंधित बिल्डरचे निधन झाले असल्याने त्याचा पाठपुरावाही शक्य नाही. वीज कंपनीचे अधिकारी खासगीत बोलताना चूक मान्य करतात. मात्र, लेखी काहीच देत नाहीत.
- ए. एन. जोशी, रहिवासी, मोरया पार्क
ट्रान्सफॉर्मरला झाडांचा वेढा
ट्रान्स्फॉर्मरला संपूर्णपणे झाडाझुडपांनी वेढले असून, त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. झाडे अथवा वेलींमधूनदेखील वीजप्रवाह थेट उतरून एखादी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत तब्बल सात वर्षांपासून पाठपुरावा करूनही कुणीच या गंभीर प्रकाराची दखल घेत नसल्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला.