आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaidev Dole News In Marathi, Media, Literature, Divya Marathi, Nashik

प्रसारमाध्‍यमांचा साहित्यावर मोठ्याप्रमाणावर परिणाम - प्रा. जयदेव डोळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - प्रसारमाध्यमात होणार्‍या बदलांचा परिणाम साहित्य क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणात झाला. कागदाची जागा संगणकाच्या स्क्रिनने घेतल्या पुरताच हा बदल झाला नाही, तर अक्षर वाड्मयाच्या अस्तित्वालाच त्यातून आव्हान दिले गेल्याची खंत प्रा. जयदेव डोळे यांनी व्यक्त केली. सिन्नर महाविद्यालयात आयोजित ‘प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रा. डोळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखालील चर्चासत्रास प्राचार्या उज्‍जवला देवरे, माजी प्राचार्य आर. जी. मेटकर, युवा मित्रचे सुनील पोटे आदी उपस्थित होते.
अभिजात दर्जा लुप्त
संगणकयुगात इ-साहित्याची वाढ झाली पण हे साहित्य अल्पायुषी ठरले. मुद्रित साहित्य टिकाऊ तर इ- साहित्य अल्पजीवी आहे. हातात मोबाइल आल्याने त्यावरील सोयी-सुविधांमुळे त्यास विविध वस्तू ठेवलेल्या एखाद्या कपाटाचे स्वरूप आले असले तरी त्यावरील साहित्यास अभिजात साहित्याचा दर्जा मात्र आला नसल्याचे परखड प्रतिपादन डोळे यांनी या वेळी केले.
अध्यक्षीय भाषणात भगत यांनी निवडणुकीत होणार्‍या वाढत्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली. सेवाभावी कार्यकर्त्यांची जागा पोटार्थींनी घेतली आहे. राज्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, एस. एम जोशींसारखी अभ्यासू व सुसंस्कृत माणसे होऊन गेली. त्यांच्या अनुकरणाची गरज असताना आज नेते व त्याच बरोबर मतदारही बदलले. तरुणवर्गामध्ये साहित्याविषयी ओढ आणि वाचन संस्कृती वाढीस लागण्याची गरज असल्याने त्यासाठी सुनियोजित प्रयत्न करण्याची गरज भगत यांनी प्रतिपादन केली. पत्रकार निशिकांत भालेराव यांनी राजकारणातील वाढती घराणेशाही व नागरिकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विशद केला.
बदलती प्रसारमाध्यमे आणि भारतीय राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावरील चर्चासत्रात रायगड, पुणे, लातूर, औरंगाबाद येथील प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘लोकपरंपरांचे सिन्नर’ या पुस्तकाचे प्रकाशन भगत यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी प्रास्तविक केले. मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शंकर बोर्‍हाडे, प्रा. अरुण पोटे यांनी चर्चासत्रामागील भूमिका विशद केली, तर प्रा. डॉ.राहुल पाटील यांनी संचालन केले.
राजकीय घराणेशाहीचे बळकटीकरण चिंताजनक
महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकीय परंपरा असल्याने मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करण्यासारखे प्रकार अपवादानेच घडतात. मतदान यंत्र आल्यापासून निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुधारली. राज्यातील सुसंस्कृत परंपरेमुळे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर वचक आहे. साहित्याप्रमाणेच प्रसारमाध्यमातून राजकारणातील गुन्हेगारीचे नियंत्रण व चित्रण होतांना दिसते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात राजकारणातील गुन्हेगारीचे प्रकार कमी घडताना दिसतात. गुन्हेगार निवडून आला तरी त्यास इतरांप्रमाणे सामाजिक प्रतिष्ठा लाभत नाही. या जमेच्या बाजू असल्या तरी राज्यातील राजकारणात घराणेशाही बळकट होताना दिसत असल्याबद्दल डोळे यांची चिंता व्यक्त केली.