आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो जैन बांधवांनी पाहिला महामस्तकाभिषेक सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आचार्य देवनंदीजी आचार्य गुप्तिनंदीजी यांच्या सान्निध्यात मंत्रोच्चारात विविध द्रव्यांनी भगवान शांतिनाथ मूर्तीच्या अभिषेक साेहळ्यात रंगलेले जैन बांधव, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर साजरा केला जाणारा आनंदोत्सव असा अद्भुत सोहळा रंगला भगवान शांतिनाथ यांच्या महामस्तकाभिषेकानिमित्ताने. देशभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या जैन बांधवांनी हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला.
श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र अंजनगिरी (अंजनेरी) येथे अखंड पाषाणात भगवान शांतिनाथ यांची २१ फुटी मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक आचार्य देवनंदीजी महाराज, आचार्य गुप्तिनंदीजी महाराज, आचार्य देवसेनजी, मुनीश्री विप्रणसागरजी यांच्या सान्निध्यात मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. २९) मोक्षकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला. महामस्तकाभिषेकात भगवान शांतिनाथ मूर्तीचा प्रथम अभिषेक अशोक ढोडीला महेंद्र ढोडीला यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मंत्रोच्चारात गुरूंच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय दिगंबर महासभेचे अध्यक्ष निर्मलकुमार सेठी, महोत्सवाचे अध्यक्ष सुमेरकुमार कालेे, अंजनगिरी ट्रस्टचे अध्यक्ष पवन पाटणी, जयचंद पाटणी यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली. यानंतर भगवान शांतिनाथ यांच्या मूर्तीला मंत्राेच्चारात दूध, दही, तूप, फळांचा रस, केसर, चंदन, रक्तचंदन, जल, औषधी द्रव्य, सुगंधी द्रव्याने फुलांनी माेठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात अभिषेक करण्यात आला. भगवान शांतिनाथ यांच्या २१ फुटी पद्मासन मूर्तीला विविध द्रव्यांनी करण्यात येणारा विलोभनीय महामस्तकाभिषेक सोहळा हजारो जैन बांधवांनी डोळ्यात साठवला. यानंतर महेंद्र गंगवाल यांच्या हस्ते मूर्तीचा सप्तरंगी अभिषेक करण्यात आला. सप्तरंगातील मूर्तीने अनेकांच्या डाेळ्याचे पारणे फेडले. यानंतर विजय लोहाडे यांच्या हस्ते महाआरती, तर जयचंद पाटणी यांच्या हस्ते मूर्तीला माल्यार्पण करण्यात आली.
महामस्तकाभिषेक साेहळ्यानंतर उपस्थित जैन बांधवांनी गुरूंचे आशीर्वाद घेऊन आनंदोत्सव साजरा केला. प्रारंभी पहाटे ५.३० वाजता जप, अभिषेक, नित्यपूजा केवलज्ञानकल्याणक विधीद्वारे मोक्षकल्याणकला प्रारंभ झाला. त्यानंतर आचार्य देवनंदीजी आचार्य गुप्तिनंदीजी यांच्या मार्गदर्शनाने ८.३० वाजता सम्मदेशिखर के कुंदप्रभ प्रभास कुट पर्वत से भगवान का मोक्षगमन, सौधर्म द्वारा मोक्षकल्याणक, अग्निकुमारद्वारा अंतिम संस्कार, गुणपूजा, मोक्षकल्याणक पूजा, विश्वशांती महायज्ञ आदी विधी करण्यात आला. त्यानंतर भगवान शांतिनाथ यांच्या मूर्तीला निर्वाण लाडू अर्पण करण्यात आला. मोक्षकल्याणक महामस्तकाभिषेकाने पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यास शरद शहा, जयेश शहा, विलास शहा, सुनील चोपडा, अभय तातेड अादी सहभागी झाले होते.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आनंद व्यक्त करताना गुरू.

पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणार
भगवान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गुरुवारी (दि. २८) खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. या वेळी त्यांनी अंजनेरी गावाबरोबर जैन धर्मस्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार असल्याचे सांगितले.

आज महाभंडारा
पंच कल्याणक प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त शनिवारी (दि. ३०) महाभंडाऱ्याचे अायोजन करण्यात आले आहे. या भंडाऱ्यात अंजनेरी गावासह परिसरातील गावांतील नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.