आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी जल अभिषेक पावडर वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पीओपीच्या गणेशमूर्तींचेही पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचा पर्याय दीड वर्षाच्या संशोधनानंतर शोधून काढण्यात आला. अमोनियम बायकार्बोनेटच्या या जल अभिषेक पावडरचे मोफत वितरण नाशिकमध्ये करण्यात आले. तब्बल ४५० किलोपेक्षा जास्त पावडर वितरित करण्यात अाली. एचपीटी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही पावडर उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमास नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने प्रबोधन घडून येत असल्याचे चित्र दिसले.

या उपक्रमाची सुरुवात एका केंद्रापासून करण्यात आली. मंगळवारी (दि. १३) महाविद्यालयीन प्रवेशद्वारावर ही पावडर सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध केली हाेती. यंदाच्या गणेशोत्सवात इको फ्रेंडली पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अमोनिअम बायकार्बोनेट (जल-अभिषेक) पावडर पाण्यात मिसळून त्यात पीओपी मूर्तीचे विसर्जन केल्यास तीन दिवसांत पीओपी मूर्ती पूर्णतः विरघळते. यासाठी यंदा नाशिक पोलिस आयुक्तालय यांच्यासोबत रेनबो फाउंडेशन आणि पालवी संस्था एकत्रित हा उपक्रम राबवत आहेत. नाशिककरांमध्ये गेल्या आठवड्यापासून याबाबत जनजागृती सुरू हाेती. सध्या हजार किलो पावडर उपलब्ध असून त्याचे वितरण सुरू आहे. त्यानंतरही पावडर शिल्लक राहिल्यास नाशिककरांपर्यंत पोहोचवविण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले. सकाळी ११ ते सायं वाजेपर्यंत ही पावडर उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रत्येकाला मूर्तीच्या उंचीनुसार पावडर देत विसर्जन पद्धती समजावून सांगण्यात येत होत्या. यावेळी डॉ. सुवर्णा पवार, डॉ. राजश्री कुटे, दीपाली खेडकर, स्वाती खंदारे यांच्यासह पालवी संस्थेचे पदाधिकारी, एचपीटी आरवायके काॅलेजचे सौरभ बेंडाळे, दिलीप पावरा, एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

या भागांतून लाभला प्रतिसाद..
देवळाली कॅम्प, सिन्नर, म्हसरुळ, त्र्यंबकेश्वर, गंगापूर गाव, गिरणारे तसेच नाशिकमधील सर्व भागातील नागरिकांनी एचपीटी कॉलेजमध्ये गर्दी केली होती.

महापालिकेसह विविध संस्थांचा सहभाग
याउपक्रमात नाशिक महानगरपालिकेसह अन्य सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा सहभाग नोंदवला अाहे. यामुळे जनजागृतीस हातभार लाभला असून, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचण्यासाठी ही गोष्ट महत्त्वपूर्ण ठरली आहे.
बातम्या आणखी आहेत...