नाशिक - जम्मू-काश्मीरमधीलराज्यकर्त्यांनी कलम ३७० याचा दुरुपयोग केला आहे. जम्मूतील जनता भारतापासून वेगळे होऊ इच्छित नाही. एकूणच जम्मू-काश्मीरमधील लोकांना आजही माहिती मूलभूत शिक्षणाच्या अधिकारांसह खरे स्वातंत्र्य अनुभवता येत नसल्याचे वास्तव जम्मू काश्मीर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी उलगडले.
गंगापूररोडवरील डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित डॉ. मुंजे स्मृति व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. या वेळी संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, विभागीय उपाध्यक्ष नारायण दीिक्षत उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय संजय सराफ यांनी करून दिला. मान्यवरांच्या हस्ते भोंसला मिलिटरी स्कूलच्या राष्ट्रीय स्तरावर अॅथेलेटिक्स स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अरुणकुमार पुढे म्हणाले की, गेल्या ६० वर्षांपासून ३७० कलम एका असंसदीय पद्धतीने कलम ३५-एच्या अंतर्भावामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थायी अस्थायी निवासी अशी परिभाषा करण्यात आली. त्यामुळे भारतीय नागरिक हे एका अर्थाने दोन भागांत विभागले गेले. ही एका अर्थाने भारतीय जनतेची राजकीय फसवणूक आहे. ३७० कलमामध्ये अस्थायी अशी व्यवस्था नव्हती. या कलमामुळे भारतीय कायद्याच्या अंतर्गत संस्थांचे अधिकारही मर्यादित झाले आहेत. देशभरातील एकाधिकारशाही संपली असताना जम्मू-काश्मीरमध्ये फक्त ५० कुटुंब एका अर्थाने जम्मू आणि काश्मीरची लूट करत आहेत.
या कायद्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या प्रश्नचिन्ह संदर्भात न्यायव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था, घटनेचे तज्ज्ञ आणि विचारवंत यांनी कुणीही
आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली नाही. जम्मू-काश्मीरमधील १२० लाख लोकांना भारतीय संविधानाच्या अंतर्गत अधिकार मिळावेत तेव्हा कुठे आपण एका अर्थाने परिपूर्ण घटनेचे समर्थन केल्यासारखे होईल आणि त्याविषयी आपल्याला गर्व वाटेल. असेही ते म्हणाले.
डॉ. बा. शि. मुंजे यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त भोंसला सैनिकी शाळेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमांतर्गत दिमाखदार संचलन करत पाहुण्यांना मानवंदना देताना शाळेतील विद्यार्थी. दुसऱ्या छायाचित्रात जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविताना एअर मार्शल अजित भाेसले.