आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर नगरपालिकेत मिळाले सत्तांतराचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - नगराध्यक्षांच्या बंगल्याचे अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरून गुरुवारी पालिकेच्या सभेतच सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडल्याने पालिकेत सत्तांतराचे संकेत मिळत आहे. याचा परिणाम दोन महिन्यांनी होणाऱ्या नगराध्यक्षांच्या निवडीवर होईल, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने भाजपच्या नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पालिकेत पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी इतर मागासवर्गीय महिला, असे आरक्षण असल्याने नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचा अडीच वर्षांचा कालावधी २८ ऑक्टोबरला संपत आहे. शहरवासीयांनी काँग्रेस आघाडीला २० पैकी १४ नगरसेवक निवडून देत स्पष्ट बहुमत दिले. मात्र, अंतर्गत कलहामुळे गेल्या अडीच वर्षांत सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. सहाजिकच त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला; तर महत्त्वाकांक्षी नगरसेवकांमुळे नगराध्यक्ष ललवाणी यांना सुरुवातीपासूनच स्वपक्षीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढत जाऊन गुरुवारी झालेल्या मासिक सभेत भविष्यातील राजकीय चित्र स्पष्ट केले. विरोधकांनी नाराज नगरसेवकांना हाताशी धरून केलेली खेळी पाहता पालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

जैनयांना मानणारा गट
जामनेरपालिकेत खासदार ईश्वरलाल जैन यांना मानणारा नगरसेवकांचा एक गट आहे. नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करून जैन समर्थक सत्ताधारी नगरसेवकांकडूनच अविश्वास ठराव आणन्याचे प्रयत्न झालेत.

१२ नगरसेवक संपर्कात
नाराज काँग्रेस आघाडीचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. खासदार जैन मंत्री महाजन यांचे सख्य पाहता भविष्यात राजकीय गणिते बदलू शकतात. नगराध्यक्ष निवडीप्रसंगी आमच्यासोबत १२ नगरसेवक असतील. - श्रीराममहाजन, भाजपनगरसेवक, जामनेर

अविश्वास दाखवल्याचा डंका
धारीवालबंधूंच्या बंगल्याचे अतिक्रमण काढून नगरविकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याच्या विषयावर नगराध्यक्षांसह त्यांच्या मोजक्या सहकाऱ्यांनी आमच्यावर अविश्वास दाखवल्याचा डंका पिटला. याच कारणावरून नाराज सदस्यांनी भाजपच्या सहा सदस्यांची साथ देत पालिकेत सत्ताधारीच अल्पमतात असल्याचे पुन्हा एकवेळ स्पष्ट केले. येत्या काळातील नगराध्यक्ष निवडीसाठी ही सुवर्ण संधी असल्याचे हेरून विरोधकांनी केलेली खेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

नगराध्यक्षांकडून चसूतोवाच
पालिकेतर्फे२७ फेब्रुवारी रोजी विशेष अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीने मंजूर केल्यानंतरच अर्थसंकल्प पालिका सभागृहात चर्चेला ठेवावा, असा सन १९६० चा कायदा आहे. मात्र, तसे केल्याने पुढील वर्षी अशी चूक होऊ देऊ नका, अशा सूचना नगरसेवक श्रीराम महाजन यांनी केल्या होत्या. त्याचवेळी ‘त्याची काळजी आम्हाला नाही, कारण पुढची सत्ता तुमची असेल’ असे सूतोवाच नगराध्यक्ष ललवाणी यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

महाजन यांना संधी मिळणार?
पुढीलनगराध्यक्षपदाचे आरक्षण महिलेचे असून मंत्री महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नावावर एकमत होऊन पालिकेत सत्तांतर होऊ शकते, असा कयास स्थानिक राजकारण्यांचा आहे. त्यामुळे सध्या विरोधात असलेल्या भाजप नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अतिक्रमणाचा कांगावा
शहरविकासआराखड्यातील रस्त्याची जागा आजही मोकळीच असून पालिकेच्या पूर्वपरवानगीनेच बंगल्याचे बांधकाम केलेले आहे; असे असताना अतिक्रमणाचा कांगावा करून केवळ आमच्या बदनामीचे षड्यंत्र चालल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक सुरेश धारीवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शेजारील प्लॉट मिळून १२ मीटरचा आहे. रितसर परवानगी घेऊनच बांधकाम केलेले आहे. त्यामुळे बँकेनेही नियमानुसार बांधकामासाठी कर्जपुरवठा केलेला आहे. याबाबतचे पुरावे या वेळी धारीवाल यांनी पत्रकारांना दाखवले.