आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘जनलक्ष्मी’ पावली, लॉकर्स उघडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तीन आठवड्यांपासून अधिक काळपर्यंत कर्मचार्‍यांनी व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाने ग्राहकांवर कोपलेली ‘जनलक्ष्मी’ अखेर गुरुवारी पावली. ज्यांच्या घरी यंदा कर्तव्य आहे, त्या ग्राहकांची विनंती व्यवस्थापनासह कर्मचार्‍यांनीही मनापासून मान्य केली आणि पोलिस बंदोबस्तात गुरुवारी बँकेचे काही लॉकर्स उघडले गेले.

दरम्यान, संचालक आणि बँक कर्मचारी नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या असून, त्यातील सकारात्मक सूर पाहता शनिवारी बेमुदत बंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे कर्मचारी नेत्यांनी सांगितले.

100 कर्मचार्‍यांना रिट्रेचमेंट देणे, करारनाम्यानुसार महागाई भत्ता न देणे, मनमानी पद्धतीने कर्मचार्‍यांचा बदल्या, निलंबन करणे अशा विविध कारणांवरून कर्मचार्‍यांनी 2 डिसेंबर रोजी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतर कामगार उपायुक्त, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यास अपयश आले होते.

संचालक मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने चर्चा करण्यात अर्थ नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे होते, तर कर्मचार्‍यांचे आंदोलनच बेकायदा असल्याचे बँक व्यवस्थापनाचे म्हणणे होते. यामुळे चर्चा कशी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

लॉकर्स सेवा सुरू
पोलिस संरक्षणात गुरुवारी काही लॉकर्स उघडण्यात आले. बँकेच्याच कर्मचार्‍यांनी ग्राहकांना सेवा दिली, शुक्रवारीही ही सेवा दिली जाणार आहे, त्यामुळे ग्राहकांना निश्चित दिलासा मिळाला आहे. माधवराव पाटील, चेअरमन, जनलक्ष्मी बँक

अखेर कोंडी फुटली
गुरुवारी को-ऑप. बँक्स एम्प्लॉइज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अँड. विलास आंधळे, बँकेचे अध्यक्ष माधवराव पाटील, संचालक जयंत जानी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात सकारात्मकता होती. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बैठक होणार असून, शनिवारी कॉसमॉस बँकेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक होणार आहे. रिट्रेचमेंट दिलेल्या 100 कर्मचार्‍यांचा प्रश्नही या बैठकीत चर्चिला जाणार असल्याने याच दिवशी तोडगा निघू शकेल, अशी शक्यता कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.