आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनलक्ष्मी’चे कामकाज ठप्पच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या 24 दिवसांपासून कर्मचार्‍यांच्या संपामुळे व्यवहार बंद असलेल्या जनलक्ष्मी सहकारी बॅँकेचे कामकाज व्यवस्थापनाने बुधवारी बंदोबस्तात सुरू केले. मात्र, कर्मचार्‍यांना कामावर परतण्याचे आवाहन करूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ग्राहकांना रिकाम्या हातीच परतावे लागले.
कमी वेतन, न पाळले जाणारे वेतन करार यांसारख्या प्रश्नांवर कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. बॅँकेच्या सर्व 30 शाखांमधील 368 कर्मचारी त्यात सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे 23 दिवसांत जवळपास 800 कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल ठप्प झाली असून कोणतेच व्यवहार होत नसल्याने ग्राहक व सभासद हैराण झाले आहेत. यामुळे व्यवस्थापनाने बॅँक पोलिस बंदोबस्तात व खासगी सुरक्षेसह सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कामकाज सुरूही केले मात्र कर्मचार्‍यांच्या प्रतिसादाअभावी व्यवहार होऊ शकले नाहीत.
सकाळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे आणि संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी कर्मचारी दूरच उभे होते. बॅँकेपासून काही अंतरावर एक पांढरी रेषा मारण्यात आली होती. ती पोलिसांनी कर्मचार्‍यांना ओलांडू दिली नाही. बुधवारच्या कामकाजासंदर्भात अध्यक्ष माधवराव पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न असफल ठरला.
व्यवहारांची जबाबदारी अध्यक्ष-उपाध्यक्षांचीच - बॅँकेत कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीत रोख अथवा सोन्याचे काही व्यवहार केल्यास त्याची जबाबदारी अध्यक्ष-उपाध्यक्षांचीच राहील. या दोन्ही पदाधिकार्‍यांनी पदाचा वापर करून केलेल्या गैरव्यवहारांबाबत सहकार आयुक्त आणि रिझर्व्ह बॅँकेकडे तक्रार केली असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. बुधवारी कर्मचार्‍यांचे आंदोलन दहशतीने दडपण्याचा प्रयत्न झाला; पण त्यात यश आले नाही. यापूर्वी विनाचौकशी 36 कर्मचार्‍यांना कमी केले आहे. असाच प्रकार यापूर्वीही दोनदा झाला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष भेटणे टाळून धमक्या व त्रास देत आहेत. अशोक जाधव व अतुल गिरी, कर्मचारी नेते