आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनशताब्दी’च्या धडकेत एक ठार, दोन जण गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - थंडीमुळे अस्वली स्थानकातील रेल्वे रुळावर काही प्रवासी ऊनाला बसले होते. अचानक या रुळाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वे आल्याने प्रवाशांची धांदल उडाली. यापैकी तीन प्रवाशांना जनशताब्दी एक्स्प्रेसची जोरदार धडक दिली. यात एक जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. तिघेही प्रवासी झारखंडमधील असून, नोकरीसाठी ते मुंबईला जात होते. मृत प्रवाशाची ओळख पटू शकली नाही. जखमी मुन्नालाल (30) व शाबीर खान (24) यांची प्रकृती
चिंताजनक आहे.
औरंगाबादहून येणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसला वाट मोकळी करून देण्यासाठी पाटणा येथून नाशिकमार्गे मुंबईला जाणारी जनता एक्स्प्रेस ही सकाळी 9.04 वाजता बाजूच्या ट्रॅकवर उभी होती. गाडी थांबल्यामुळे थंडीमुळे ऊन घेण्यासाठी जनता एक्स्प्रेसचे काही प्रवासी मुंबईकडे जाणा-या ट्रॅकवर बसले होते. सकाळी 9.22 वाजेच्या सुमारास मुंबईकडून एलटीटी-कानपूर तर नाशिककडून सुपरफास्ट जनशताब्दी एक्स्प्रेस एकाचवेळी आल्या. ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांचे मुंबईकडून येणा-या कानपूर एक्स्प्रेसकडे लक्ष होते. दोन्ही चालकांकडून हॉर्न वाजवण्यात येत होते. अचानक प्रवाशांचे लक्ष नाशिककडून येणा-या गाडीकडे गेले आणि त्यांची एकच धांदल उडाली. कुठे पळावे हे लक्षात येण्यापूर्वीच जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनाचा जोरदार फटका बसल्याने एक जण जागीच ठार, तर दोघे जखमी झाले. जखमींना अस्वली रेल्वे स्थानकाचे अधीक्षक विवेक खैरनार यांनी मुंबईकडून येणा-या गीतांजली एक्स्प्रेसमधून तातडीने
नाशिकला पाठवले.
मंगला एक्स्प्रेसच्या अपघाताची आठवण
दोन महिन्यांपूर्वी 15 नोव्हेंबरला याच मार्गावर घोटी स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेस ट्रॅकवरून घसरल्याने तीन प्रवासी ठार, तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. शुक्रवारच्या अपघातानंतर या स्मृती जाग्या झाल्या.