आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील जनता दरबारही रद्द करण्याची पालकमंत्र्यांवर नामुष्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्ररित्या आयोजित करण्यात आलेला ‘जनता दरबार’ही रद्द करण्याची नामुष्की पालकमंत्र्यांवर ओढविली आहे. 

मालेगाव पाठोपाठ आता १६ डिसेंबर रोजी होणारा नाशिक शहरातील जनता दरबार रद्द करण्यात आला असून, त्याची पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नसल्याने आणि पहिल्या जनता दरबारातील नागरिकांच्या तक्रारींना उत्तरेही मिळाली नसल्याने पालकमंत्र्यांची अवस्था हात दाखवून अवलक्षण अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. 

नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी वाजतगाजत आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’मध्ये प्रमाणापेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे मालेगाव, कळवण, देवळा आणि चांदवडच्या आणि शहरातील तक्रारींसाठी स्वतंत्र जनता दरबार घेण्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. तालुक्यांचा दरबार नोव्हेंबरला तर शहरासाठी १६ नोव्हेंबरची तारीख अंतिम झाली होती. 

परंतु, ग्रामीणचा नोव्हेंबरचा दरबार रद्द करत त्याची नव्याने तारीख जाहीर करण्याचे लेखी सांगण्यात आले होते. पण आठ दिवस उलटूनही ती निश्चित झाली नाही. दुसरीकडे शहरातील दरबारही रद्द करण्यात आला. तसेच तारखेत बदलाचे सूचित करण्यात आले, पण नवीन तारीख मात्र जाहीरच करण्यात आली नाही. त्यामुळे उर्वरित चार तालुके आणि मनपाच्या तक्रारींसाठी जनता दरबार भरतो की नाही याबाबत संभ्रम असून, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला जनता दरबार हा पहिला आणि शेवटचाच दरबार ठरतो की काय अशीच चर्चा सुरू आहे. तर शहरातील चारही आमदार भाजपा-सेना युतीचेच असून तीन आमदार भाजपचेच आहेत. महापालिकेतही भाजपची एकहाती सत्ता आहे. असे असतानाही जनतेच्या वाढत्या तक्रारी पाहता सत्ताधाऱ्यांकडून कामे होत नाहीत का असा सवाल या दरबाराच्या माध्यमातून उपस्थित होण्याची शक्यता असल्यानेच की काय दरबारासाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याचे आरोप नागरिकांसह विरोधकांकडूनही केले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...