आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावरील ‘जनता खाना’ गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सर्वसाधारण प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केलेला जनता खाना गायब झाला आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून स्थानकावरील उपाहारगृहामध्ये या खान्याची जागा इतर महागड्या पदार्थांनी घेतली आहे. परवणारे खाद्यपदार्थ मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांची उपासमार होत आहे.

प्रवाशांच्या माहितीसाठी दर्शनी भागावर मोठय़ा अक्षरात फलक लावण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून उपाहारगृहचालकांनी छोट्या कागदावर इंग्रजीत लावलेल्या फलकामुळे ‘जनता खाना’पासून प्रवासी वंचित राहत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने गरीब प्रवाशांना माफक दरात (15 रुपये) जनता खाना मिळावा म्हणून प्रत्येक स्थानकावर योजना सुरू केली. प्रत्येक उपाहारगृहचालकाला जनता खाना ठेवणे बंधनकारकही केले; मात्र नियम सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाहणी दौर्‍याच्या दिवशी आणि तेवढय़ाच वेळेत जनता खाना उपलब्ध होतो. अधिकारी रवाना होताच जनता खाना गायब होत असल्याचा प्रकार घडत आहे.

दंडात्मक कारवाई : भुसावळ मंडल प्रबंधक महेश गुप्ता यांच्या स्थानक पाहणी दौर्‍यात उपाहारगृहात जनता खाना उपलब्ध नसल्याचे आढळून आले. शिवाय, जनता खानाचा फलक लावलेला नसल्याने उपाहारगृहचालकावर दोन हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली होती. तरीही चालकांनी मोठय़ा अक्षरात फलक लावला नाही. तसेच, फलक मराठी, हिंदीऐवजी सामान्यांना वाचता येऊ नये म्हणून ‘साहेबाच्या भाषेत’ लावला आहे.
जनता खान्यात काय
जनता खानाचे पाकीट 15 रुपयांना मिळते. त्यात 7 पुर्‍या, बटाट्याची भाजी, लोणचे, मिरची असते.

तिकिटावर जेवण
प्रवाशांना जनता खाना हवा असल्यास प्रवासाचे तिकीट दाखवल्यास ते मिळू शकते, असा हास्यास्पद पर्याय अधिकार्‍यांनी सुचवला.

कारवाई करणार
माफक दरात जनता खाना मिळत असल्याने प्रवाशांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांकडून मागणी होत असल्याने तिकीटधारकांना जनता खाना उपलब्ध करून दिला जातो. फलक लावलेला नसल्यास कारवाई केली जाईल. एस. डी. कीर्तीकर, वाणिज्य अधिकारी