आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japanese Youth News In Marathi, Vipashyan, Nashik, Divya Marathi

जपानहून आला; भटकंतीला गेला, 700 मीटरवर कपारीत अडकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - अवघा 25 वर्षांचा जपानी तरुण...मन:शांतीसाठी इगतपुरीनजीक धम्मगिरी येथील विपश्यना विश्वविद्यापीठात साधनेसाठी आलेला...रविवारी शिबिर संपल्यावर त्याला व सहका-यांना येथील निसर्गसौंदर्याने खुणावले...मात्र ट्रेकिंगसाठी निघालेल्या या विदेशी पाहुण्याला परिसरातील भटकंती चांगलीच महागात पडली... दोन तासांत डोंगर सर केल्याचा आनंद व्यक्त करत असतानाच तो पाय घसरून पडला...घरंगळत गेला...सुमारे 700 मीटर उंचीवर कपारीत अडकल्याने त्याचे प्राण धोक्यात आले होते. पण, परिसरातल्या आदिवासी बांधवांनी जपानहून आला; भटकंतीला गेला, 700 मीटरवर कपारीत अडकला प्रसंगावधान राखून त्याचे प्राण वाचविले आणि हा बाका प्रसंग अत्यंत समयसूचकतेने निभावून नेला.


विपश्यना केंद्रातील शिबिर रविवारी सकाळी संपल्यानंतर परदेशातून आलेले चार साधक केंद्राच्या मागील बाजूस विस्तीर्ण पसरलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळुंगा डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले. दोन तासांत त्यांनी हा डोंगर सर केला. त्याचा अतोनात आनंद झालेला असतानाच त्यांच्यातील जपानमधील टोकयोचा रहिवासी असलेला 25 वर्षीय सतू लो बोडो हा पाय घसरल्याने डोंगरावरून घरंगळत वेगाने खाली आला आणि एका कपारीत अडकला. तो जमिनीपासून सुमारे 700 मीटरवर होता. त्याचा आवाज सोबत असलेल्या तिघांना ऐकू येत होता; परंतु तो त्यांना दिसत नव्हता. काही काळ शोध घेतल्यावर घाबरलेल्या या तिघांनी विपश्यना केंद्र गाठले व सर्व घटनाक्रम व्यवस्थापकांना सांगितला. त्यांच्या सूचनेवरून घटनास्थळी गेलेल्या सुरक्षारक्षकांनाही हा तरुण सापडला नाही. धम्मगिरीत काम करणा-या आणि डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या गोळीबार वाडीतील दत्तू कामडी, काशीनाथ कामडी, मुरलीधर कामडी, बुधा झुंगरे, दशरथ कामडी, नारायण बोंडे यांना ही घटना कळताच त्यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हातातील काम सोडून चार मोठे दोरखंड, दुर्बीण घेऊन डोंगराच्या दिशेने धाव घेतली. तरुण अडकलेल्या कपारीत जाणे धोकादायक असल्यामुळे त्यांनी वरील बाजूस दोरखंड बांधून त्याच्या साहाय्याने कपारीपर्यंत उतरून त्याला बाहेर येण्यास मदत केली. दोन तास प्रयत्न केल्यावर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली व त्यानंतर त्याला इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. डॉ. गौरव कुलकर्णी, परिचारिका ए. एस. दोंदे, अश्पाक शेख यांनी त्याच्यावर उपचार केले.


संकटातून वाचताच साधना
जिवावर बेतलेल्या संकटातून वाचल्याचा आनंद या जपानी साधकाच्या चेह-यावर दिसत होता. त्याचे प्राण वाचविणा-या आदिवासी बांधवांचे व्यवस्थापनासह सर्वांनी कौतुक केले. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले तेव्हा या तरुणावर साधनेचा प्रचंड प्रभाव असल्याचे जाणवले. त्याने जखमांकडे दुर्लक्ष करून बेडवरच साधनेस सुरुवात केली.