आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकच्या समोशाची इंग्लंडच्या खवय्यांना चटक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समोशावाल्याचा मुलगा लंडनला जातो. खरं तर हेच विशेष आहे. पण, त्याहीपेक्षा विशेष म्हणजे तो मुलगा आपले समोसे तिथल्या एका हॉटेलमध्ये प्रसिद्ध करतो, हे अचंबित करणारे आहे. आता हा समोसा आपल्याकडे कुठे मिळतो, याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. तर फार दूर जायची गरज नाही. जुन्या सिडकोतील शिवाजी चौकात ‘जयंत समोसा’ या छोटेखानी हॉटेलात आपले स्वागतच होते.

जुने सिडको, शिवाजी चौक येथील जयंत समोसा हे 25 वर्षांपासून नाशिककर खवय्यांच्या पसंतीस उतरलेले आहे. सन 1988 मध्ये अरविंद सोनार यांनी हातगाडीवर समोसा विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी एक रुपयाला समोसा मिळत होता. आपला व्यवसाय करताना प्रामाणिकपणाच्या जोरावर दर्जा व चव त्यांनी कायम ठेवली. त्यानंतर अनेक व्यावसायिक आले; मात्र स्पर्धेत ‘जयंत समोसा’ केवळ चव आणि दर्जामुळेच टिकून असल्याचे ते अभिमानाने सांगतात. हा व्यवसाय करण्यासाठी अरविंद सोनार यांना त्यांची पत्नी मंगला सोनार व मुलगा जयंत यांची मदत मिळते. स्वत:च मसाला दळून समोसे बनवितात. त्यांच्या हातालाच चव असल्याचे अनेक खवय्ये सांगतात. समोसा बनविताना त्यातील मसाल्याची चव, आतील बटाटा व वापरण्यात येणारे तेल या प्रत्येक बाबतीत एक वेगळेपण आहे. या समोशाबरोबरच वडापाव, पाववडा आणि मिसळही येथे मिळते. येथील हे सर्व पदार्थ कमी तेलाचे असल्याने त्याचा आरोग्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे सोनार खात्रीने सांगतात.
प्रामाणिकपणाचा दाखला...
‘जयंत समोसा’ या हॉटेलचे मालक अरविंद सोनार यांचा मुलगा जयंत याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन येथील हॉटेल जॉफिटेल, व्हियोप्रो एअरपोर्ट येथे काम केले. या वेळी त्याने तेथे बनविलेला समोसा तेथील खवय्यांना अतिशय आवडला. त्याने भारतातून नेलेल्या समोशाचा मसाला तेथील हॉटेल मॅनेजरच्या पत्नीने घरी ठेवून घेतल्याचा अनुभव जयंतने बोलून दाखवला. लंडनमधील लग्नसमारंभातही भारतीय पदार्थ म्हणून त्यांनी समोशाला पसंती दिली. आपल्या वडिलांच्या मेहनतीमुळे व प्रामाणिकपणामुळेच आपला भारतीय पदार्थ तिथे पोहोचवू शकल्याचे जयंतने सांगितले.
सेवा हेच समाधान
आम्ही स्वत: मसाला तयार करतो. येथे मिळणार्‍या चटण्याही स्वत:च तयार करतो. नाश्ता करून जाणारा प्रत्येक ग्राहक समाधानी झाला पाहिजे, याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असतो. यापुढेही आमचे काम प्रामाणिकपणे करून सेवा करू. सर्वांच्या आशीर्वादामुळेच आम्ही 25 वर्षांपेक्षा जास्त काळापासून व्यवसाय करीत आहोत.
अरविंद सोनार, संचालक, जयंत समोसा