आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक; इंदूर रेल्वेचे फाटक उघडले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्योत्तर कालखंडात किमान चार दशकांहून अधिक प्रदीर्घ काळ महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या पंचक्रोशीत चर्चेत राहिलेल्या ‘मनमाड-धुळे-नरडाणा-इंदूर’ या रेल्वेमार्गाचे फाटक आता नजीकच्या काळात लवकरच उघडले जाईल अशी एकूण सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. संरक्षण राज्यमंत्री म्हणून डॉ. सुभाष भामरे केंद्रात पंतप्रधानांचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत असले अन् देशांच्या सीमांवर दौरे करीत असले, त्याउपरही आपल्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणूनही दायित्व आहे याची पुरेपूर जाण असल्यामुळे डॉक्टरांनी इंदूर रेल्वेमार्गाच्या कामालादेखील अग्रक्रम दिला होता. लोकप्रतिनिधीने एखादी लोकोपयोगी योजना हाती घेतल्यानंतर तिचा पाठपुरावा नेटाने करीत ती पूर्णत्वास जाऊ शकते हेच डॉक्टरांच्या या कृतीतून प्रथमदर्शनी स्पष्ट होते. सत्तास्थानावर आरूढ झाल्यानंतर कशाला अग्रक्रम द्यायचा वा कशाला द्यायचा नाही हेदेखील लोकप्रतिनिधीच्या मर्जीवर अवलंबून असते. सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने खरी ठरवायची की निव्वळ थापा मारायचा हेदेखील लोकप्रतिनिधींच्या स्वभावातच दडलेले असते. कारण पाच वर्षांचा कालावधी लोटला की ‘तू कोण’ अन् ‘मी कोण’ अशा अाविर्भावात ही मंडळी वावरतात असा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे. बरेच लोकप्रतिनिधी कोणत्या ना लाटेवर निवडून येतात. त्यामुळे सगळेच गंभीर असतातच असे नाही. पंचवार्षिकातील गोळाबेरीजचा अंदाज घेत यातील काही लोकप्रतिनिधी काम केल्याचे दाखवतात खरे, परंतु त्यांचा अजेंडा पूर्णत: छुपा असतो. त्यानंतरच्या निवडणुकीनंतरही अशी मंडळी राजकारणाच्या पटलावरूनच गायब होतात. कारण त्यांचा हेतू साध्य झालेला असतो. पण चालून आलेल्या संधीचे सोने कसे होईल अर्थात पुढच्या टप्प्यात आपल्याला लोकप्रतिनिधी होण्याची संधी कशी मिळू शकेल यादृष्टीने काम करीत राहतात. त्यामुळेच अशा लोकप्रतिनिधींमुळे आपापल्या परिसराचा, प्रभागाचा, गावाचा, शहराचा विकास होत असतो. मनमाड ते इंदूर या रेल्वेमार्गाचा विषय हा उपरोक्त मांडणीतील मुद्यांशी साधर्म्य असलेला आहे. कारण मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-इंदूर हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास जावा म्हणून अनादी काळापासून लोकप्रतिनिधी आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न करीत आले आहेत. यात अनेक दशके निघून गेलीत. 


आजवर नाशिक, दिंडोरी वा धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवलेल्या जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात इंदूर रेल्वेमार्गाचाच विषय पहिल्या क्रमांकावर टिकून होता. त्यामुळे आता हा विषय मार्गी लागतो आहे असे दृष्टिपथात येताच त्याचे श्रेय घेण्यावरूनही लोकप्रतिनिधींमध्ये अहमहमिका सुरू होइल. मला जेवढे आठवते त्यानुसार इंदिरा गांधींचे एकनिष्ठ म्हणून दिल्लीपासून ते नाशिकपर्यंत परिचित असलेले काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार झांगरू मंगळू कहांडोळे, त्यांचे तहयात प्रतिस्पर्धी राहिलेले जनता दलाचे दिवंगत नेते हरिभाऊ महाले यांच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत रेल्वेमार्गाचा हा विषय ठरलेला असायचा. मालेगावचे साथी निहाल अहमद यांच्या कार्यकाळातही रेल्वेचा मुद्दा अन् त्या अनुषंगाने मालेगावच्या विकासाला कशी खीळ बसली ही बाब जाहीर सभांमधून आवर्जून मांडली जायची. विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण आजवर तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्याही प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये इंदूर रेल्वेचा विषय हा ठरलेलाच. थोडक्यात काय तर लोकसभेची निवडणूक म्हटली की इंदूर रेल्वेचा विषय हा प्रत्येक उमेदवाराच्या अजेंड्यातील प्राधान्यक्रमाचा मुद्दा ठरलेलाच. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्याही जिव्हाळ्याचा हा विषय राहिला आहे. डॉक्टर भामरे व आमदार गोटे या द्वयींचे कार्यक्षेत्र धुळ्याचेच अन् दोघेही भाजपचेच. त्यांच्या जोडीला दिंडोरीचे खासदार चव्हाण हेही एकाच पक्षाचे सहकारी. यामुळे रेल्वेमार्गाचे फाटक उघडण्याचे श्रेय घ्यायचे कुणी, असा प्रश्न उभा राहिला असणार. सध्या तरी तसे नाट्य उभे राहिलेले नाही. या प्रकल्पामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा बाळगण्यास काहीच हरकत नसावी. रेल्वेमार्ग आला म्हणजे त्याला लागून असलेल्या परिसराचा विकास होण्यास नक्कीच हातभार लागतो. पण हा विकास सकारात्मक असावा. डॉ. भामरे केंद्रात मंत्रिपदावर असल्यामुळे निधीची उपलब्धता, अानुषंगिक मंजुऱ्या, प्रकल्प सुरू होण्याआधी येणारे अडथळे वेळीच दूर करू शकतील अशी अपेक्षा आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे मुख्यालय नाशिकला असणार असे सांगितले जाते आहे, ही आनंदाची बाब. एकूणच, इच्छाशक्ती असेल तर तेथे मार्ग निघतोच. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे फाटक टायमिंगवर उघडले गेलेच तर तेही याच कारणामुळे हे निर्विवाद ! 


-जयप्रकाश पवार,  निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...