आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक; वसाका झाला सुरू...!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

हाराष्ट्रात निव्वळ सहकारी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या साखर कारखान्यांच्या पंक्तीतील एक असलेला नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील ‘वसाका’ अर्थात वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना दीर्घ विश्रांतीनंतर पूर्ववत सुरू झाला आहे. या ठिकाणी ‘विश्रांती’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण हा कारखाना जर्जर करून जेव्हा चालेनासा केला गेला त्याच काळात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अथवा राज्याच्या बहुतांशी ऊस उत्पादक पट्ट्यातील अनेक कारखान्यांतील चरकाच्या पात्यांची गती हळूहळू मंदावत चालली होती. त्यापैकी काही आजही कासवाच्या चालीने चालताहेत, तर बऱ्याच कारखान्यांची गणना बंद पडलेल्यांमध्ये होत आहे. कालौघात त्या त्या वेळच्या कारभाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे एक तर कारखाना कर्जाच्या खाईत इतका खोलवर लोटला गेला की तो तेथून बाहेर पडण्याची कुठलीही चिन्हे दिसत नव्हती. किंबहुना तशी गंभीर अवस्थाच कारभाऱ्यांनी निर्माण केली. पैकी ज्या कारखान्यांमध्ये थोडीफार धुगधुगी होती, त्यातील यंत्रसामग्री बऱ्यापैकी सुस्थितीत होती, गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर किमान तो दोन-चार महिने अखंडितपणे राहील अन् हजार-दोन हजार पोती साखर उत्पादित होऊ शकेल याची शाश्वती असलेले कारखाने तग धरू शकतील. अशा कायमस्वरूपी ‘बंदस्थितीतील’ अन् काही काळापुरते गळीत थांबलेले अर्थात ‘विश्रांती’ घेणाऱ्या अशा दोन श्रेणीतील जे काही कारखाने पूर्ववत सुरू होऊ शकले त्यातील एक म्हणजेच वसाका म्हणता येईल. नाशिक जिल्हा हादेखील एकेकाळी साखर उत्पादनात अग्रेसर होता. आता हा इतिहास झाला. कारण नाशिक जिल्ह्यातील निफाड, रानवड, कादवा, दाभाडी, रावळगाव, विठेवाडी, नाशिक, केजीएस अन् द्वारकाधीश असे एकूण नऊ साखर कारखाने आजही कागदोपत्री आहेत. त्यापैकी रावळगाव, द्वारकाधीश व केजीएस हे तीन कारखाने पूर्णत: खासगी आहेत. दिंडोरी तालुक्यातील कादवा हा कारखाना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अधिपत्याखाली असून त्याचा हंगाम सुरळीत आहे. रावळगाव हा गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जाच्या बोजाखाली सापडल्यानंतर लिलावात निघालेला दाभाडी कारखाना हादेखील नंतरच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अखत्यारीतील आर्मस्ट्राँग कंपनीच्या स्वामित्वाचा झाला आहे. नाशिक कारखाना राष्ट्रवादीचेच एक वादग्रस्त माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या कारभारामुळे चांगलाच अडचणीत आला अन् शेवटच्या घटका मोजत मोजत एकदाचा निपचित पडला. अशीच काहीशी अवस्था निफाड व रानवडची आहे. मध्यंतरी रानवड कारखाना मराठवाड्यातील भाजपच्या एका नेत्याच्या कंपनीने चालवायला घेतला होता. एक-दोन हंगाम व्यवस्थित पार पडले अन् त्यालाही घरघर लागली. गेल्या दोन वर्षांपासून गळीत खंडित झाले. त्याच्याच शेजारी असलेला निफाड हा जवळपास पाच वर्षांपासून बंद आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने निफाड कारखान्याच्या आजूबाजूला पडीक असलेल्या जमिनीवर ड्रायपोर्ट प्रस्तावित आहे. केंद्र व राज्याच्या समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लागलाच तर या कारखान्यालाही जीवदान मिळू शकणार आहे. 


एकूणच उत्तर महाराष्ट्रातील - बव्हंशी सहकारी साखर कारखान्यांची अवस्था काही ठिकाणी भंगाराची, तर काही जागी बेताची असल्याच्या निराशाजनक पार्श्वभूमीवर ‘वसाका’ सुरू करण्याचे धाडस देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दाखवले. माजी मंत्री दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांचे राहुल वारसदार आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य कोटीतील कोणतेही काम शक्य होऊ शकते हेच यातून सिद्ध होते. बँकेच्या लेखी वसाकाचे खाते एनपीए प्रकारात मोडत असल्यामुळे कर्जपुरवठा होणे अशक्यप्राय. पण डॉ. राहुल यांनी जिद्द सोडली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा पुरवत सरतेशेवटी मुंबईस्थित एका बँकेकडून तब्बल दहा कोटींचे कर्ज उचलले. कारखान्याचा हंगाम सुरू केला. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या थकीत वेतनातील रकमेचा एक हप्ता अदा केला अन् आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने जे काम केले नाही ते करून दाखवले.  कोट्यवधीच्या कर्जाची हमी स्वत: घेतली. कारखाना म्हटला तर सहकारी तत्त्वावरचा. त्याच्या कारभारात राजकारण हे अपरिहार्य. त्याउपरही राहुल यांनी कर्ज उचलण्याचे धाडस दाखवतानाच वडिलांची स्वप्नपूर्ती तर केलीच, शिवाय ‘कसमादे’ अर्थात कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांच्या पंचक्रोशीतील तब्बल पंचवीस हजारांहून अधिक ऊस उत्पादक सभासदांचा दुवादेखील मिळवण्यात यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नसावी. 


जयप्रकाश पवार - निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...