आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्सल देशी, समृद्ध मायबोलीचा सन्मान...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘कोसला’कार ज्येष्ठलेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील सर्वोच्च असलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होताच नाशिककरांच्या मनात दोनच वर्षांपूर्वी झालेल्या जनस्थान पुरस्कार साेहळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा त्यांनी भाषणात जो काही ‘नेमाडपंथी’ प्रहार केला होता, त्याला यानिमित्ताने पुन्हा उजाळा मिळाला. हा सन्मान म्हणजे त्यांच्या चाकोरीबाहेरील लेखनाचा तर आहेच, पण साहित्यातील देशीपणाचा भाषा आणि साहित्याबरोबरच विचारांचाही असल्याच्या आनंद व्यक्त करणा-या प्रतिक्रिया नाशिककर साहित्यिकांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या.

‘कोसला’ वाचलंस का तू..?
एकपूर्ण पिढी ‘कोसला’ वाचलंस का तू..? असा प्रश्न विचारत त्यावर बोलतच मोठी झाली आहे. त्यांचा देशीवाद वा बोलण्यात रोखठेकपणा असला, तरी ते स्वातंत्र्य त्यांच्या साहित्यातही दिसते. ‘कोसला’ ते ‘हिंदू’ हा प्रवास प्राध्यापक, कवी, समीक्षक आणि देशीवाद हेच अधोरेखित करतो. त्यांच्या विचारांमध्ये ‘क्लॅरिटी’ आहे. त्यामुळेच त्यांना मिळालेल्या या सन्मानाने नव्याने त्यांच्या साहित्याच्या दखल घ्यावीच लागेल. इंग्रजीचा प्राध्यापक, मराठीचा लेखक यामुळे इंग्रजाळलेलेही जरा वेगळ्या दृष्टिकाेनातून त्यांच्याकडे बघतील. -प्रा. डॉ. वृंदा भार्गवे

घुसमट तळापर्यंत
नेमाडेंंच्यालिखाणाची वेगळी वाट ‘कोसला’तून दिसते. म्हणूनच ‘कोसला’ खेड्यापासून शहरापर्यंत येतं. विषयाच्या तळापर्यंत जाण्याची हातोटी त्यांच्या साहित्यात दिसते. जगण्याची घुसमट तळापर्यंत त्यांच्या शब्दांनी नेली. मग त्यात कविता असो, कादंबरी असो, त्याला नवे आयाम दिले. मराठीला राजभाषेचा दर्जा आणि मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ हा म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे.
प्रकाश होळकर
चाकोरीबाहेरील लिखाणाचा सन्मान
‘कोसला’पासूनते ‘हिंदू’पर्यंतचा त्यांचा लेखनप्रवास हा चाकोरीबाहेरचा आहे. त्यात ‘कोसला’ तर लॅण्डमार्क हाेती. या लिखाणाला लोकमान्यता होतीच, पण आता त्यावर राजमान्यतेची मोहोर उमटली आहे. भाषा आणि साहित्याच्या गौरवाचा हा क्षण आहे. -विनायकदादा पाटील
सच्चेपणाचं कौतुक
नेमाडेहे साहित्यातील बलदंड नाव आहे. ते ललित लेखनापुढे गेले आहेत. सृजनात्मक लेखनातला आदर्श त्यांनी निर्माण केला. मेलडी हा प्रयोगही वेगळाच होता. त्यांचं वेगळेपण कायम चर्चेत राहिलं. त्यांच्या लेखनात सच्चेपण दिसतं. भाषा, संस्कृती आणि साहित्यातून त्यांनी देशीपण जपलं. साहित्यविषयक भूमिकेवर ते ठाम आहेत, याच त्यांच्या सच्चेपणाचं हे कौतुक आहे असं वाटतं. - किशोरपाठक