आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या नावाखाली मुलाखतीचा फार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून राज्यभरातील सुमारे दोन हजारहून अधिक बेरोजगारांची मुलाखत घेण्याचा बनाव मंगळवारी उघडकीस आला. घेतली जाणारी मुलाखत फसवणूक असल्याचे लक्षात आल्यावर उमेदवारांनी या प्रकाराचा जाब विचारत गोंधळ घातल्याने मुलाखतीसाठी आलेल्या स्थानिक युवकांना प्रत्येकी 100 रुपयांचा परतावा देऊन घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न मुलाखतकारांनी केला. तर, बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना पैसे देण्यास नकार देण्यात आल्याने त्यांना हात हलवत परतावे लागले. या प्रकरणी मात्र कोणीही तक्रार दिली नाही.

नामांकित कंपन्यांत कायमस्वरूपी नोकर्‍या, 14 हजारांहून अधिक जागा, दहावी- बारावीपासून ते पदवीत्तर पात्रता असलेल्या बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी, अशा आशयाची ‘खुशखबर’ जाहिरात प्रसिद्ध करून सिन्नर येथील येलमामे कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार सुरू होता. ‘एएनएस नेट सोल्यूशन’ या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालकासह तालुक्यातील सात ते आठ विशीतील तरुणांनी या मुलाखती आयोजित केल्या होत्या. नोकरी मागणी अर्ज भरून घेताना प्रत्येकी 110 रुपये शुल्क जमा करण्यात आले होते. त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून मंगळवारी येलमामे कॉम्प्लेक्सच्या सभागृहात मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. नाशिकसह लातूर, अहमदनगर, जळगाव, मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून सुमारे दोन हजार उमेदवार सकाळी मुलाखतीसाठी उपस्थित झाले. 11 वाजेच्या सुमारास मुलाखती सुरू झाल्या. मात्र, मुलाखतकारांचाच ‘आवाका’ लक्षात आल्याने उमेदवारांमध्ये आपली फसवणूक होत असल्याची चर्चा सुरू झाली.

नामांकित कंपन्यांची केवळ नावे असून, त्यांचे अधिकारी दिसत नसल्याने उमेदवार अस्वस्थ झाले. 28 जून रोजी कामावर रुजू होण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना देताना मुलाखत घेणारे जुजबी प्रश्न विचारण्यातही कमी पडत असल्याचे दिसत होते. मेकॅनिकल इंजिनिअर पदासाठी बारावी झालेला युवक मुलाखत घेत असल्याचे मुलाखतीसाठी आलेल्या स्थानिक उमेदवारांच्या लक्षात येताच मुलाखतकारांचे बिंग फुटले. त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. युवकांनी पैसे परत देण्याची मागणी करताच बाहेरगावाहून आलेल्यांकडे दुर्लक्ष करत स्थानिक युवकांना त्यांच्याकडून घेतलेल्या 110 रुपयांपैकी शंभर रुपये परत देण्यात आले. खर्च झालेले प्रवास भाडे- मानसिक त्रास यामुळे बाहेरगावाहून येणार्‍या उमेदवारांनी संताप व्यक्त केला.

फसवणूक झाली
नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळण्याच्या आशेने मुलाखतीसाठी एक दिवसापूर्वीच घरातून बाहेर पडलो. मात्र, हा फसवेगिरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. नोकरी अर्जाच्या शुल्कापोटी घेतलेली रक्कम देण्यास संबंधितांनी नकार दिला. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. - नेताजी कदम, बीई मेकॅनिकल, लातूर

स्पर्धकांचे षड्यंत्र
आज नामांकित कंपन्यांचे अधिकारी मुलाखतीसाठी आले नाहीत. यापूर्वी एएनएस नेट सोल्यूशनच्या माध्यमातून 328 जणांना नोकर्‍या दिल्या. आज काही उमेदवारांची निवड झाली असून, त्यांना नोकर्‍या देण्यात येतील. शासनाचे कोणतेही रजिस्ट्रेशन नाही. स्पर्धकांनी बेरोजगारांचा गैरसमज करून दिल्याने गोंधळ झाला.- अमोल वाजे, संचालक, एएनएस नेट सोल्यूशन