आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कस मधील जोकर म्हणतात जाने कहाँ गये वो दिन...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देवानं उंची दिली नाही म्हणून, जोकर झालो. जोकर झालो म्हणून लोकांना हसवलं. पण आता हे हसवणंच आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. आता उंची कमी असण्याची खंत नाही, तर अभिमान वाटतोय. देवानं पुढचा जन्म कोणाचा हवा असं विचारलं, तर आम्ही सांगू जोकरचा! असं बॉम्बे सर्कसमधील जोकर भरभरून बोलत होते.

६७ वर्षांपासून २६ वर्षांपर्यंतच्या जोकरची कहाणी वेगवेगळी आहे, पण भाव मात्र एकच, लोकांना हसवणं. सर्कशीची दिवसेंदिवस होणारी वाताहत बघून सगळेच निराश झालेत. सर्कस बंद झाली तर पुढे काय? हा यक्षप्रश्न त्यांना अनेकदा सतावतो. पण जेव्हाही खेळ सुरू होतो तेव्हा स्वत: हसत दुसऱ्यांना हसवण्याचा प्रयत्न ते मनापासून करत असतात. त्यांच्या जगण्याची सर्कस जेव्हा ते व्यक्त करतात तेव्हे ते जुन्या आठवणींमध्ये गढून जातात, या व्यथा-वेदना आणि आनंदही व्यक्त होताना त्यांच्याही ओठावर एकच गाणं असतं.. ‘जाने कहा गये वो दिन...’
कॅन्सरकडे दुर्लक्ष करून हसवलं
तुलसीदास चौधरी. वय ६७. ५५ वर्षांपासून ग्रेट बॉम्बे सर्कसमधील जोकर म्हणून काही वर्षांपूर्वी ते कॅन्सरमुळे जर्जर झाले. प्रोस्टेड आणि किडनी असे दोन प्रकारचे कॅन्सर इवल्याशा शरीरात वाढले. दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यात. मात्र त्याने तुलसीदास खचून गेले नाही, की सर्कस मधून त्यांनी निवृत्तीही घेतली नाही. ‘जिंदगी जबतक है तब तक सर्कस में काम करेंगे.. जिएंगे यही मरेंगे भी यही’ असं ते ठामपणे सांगतात.

उंची सामान्य असून परिस्थितीमुळे जोकर ब्रिजकिशोर प्रसाद. वय ३६. गेल्या १४ वर्षांपासून सर्कसमध्ये काम करताय. ब्रिजकिशोर मुळचे बिहारचे. घरच्या बिकट परिस्थितीमुळे ते सर्कशीत आले. विशेषम्हणजे त्यांची उंचीही सर्वसामान्य माणसाइतकीच आहे. तरीही त्यांनी जोकरचं काम करणं स्वीकारलं. जोकरशिवाय सर्कस नाही, त्यामुळे जोकरला यापुढेही कधी मरण नाही, असं तो सांगतो. ‘हम भी किसीसे कम नही’ असं तो छाती फुगवून सांगतो.

भावाच्या भीतीने सर्कस गाठली
हरी जावळे. वय ४२ वर्ष. गेल्या २० वर्षांपासून सर्कसमध्ये काम करताय. बॉम्बे सर्कसमधील एकमेव महाराष्ट्रीयन जोकर. मुळचे सोलापूरचे. दहावी नापास झाल्यावर त्यांना त्यांचा भाऊ मारत. त्याला घाबरून त्यांनी घर सोडलं आणि त्यांनी थेट सर्कस गाठली. शिकलो असतो तर अजून मोठा झालो असतो, अशी खंत हरी व्यक्त करतो. त्यांचे वर्गमित्र आणि मैत्रणी क्लास वनच्या पोस्टवर काम करत असल्याचे ते अभिमानानं सांगतात.
हसरा जोकर रडका नसतो
महेश राम. वय २६ वर्ष. गेल्या १४ वर्षांपासून सर्कसमध्ये काम करताय. जोकर म्हणूनच काम करताना महेशला आनंद वाटतो. हसरा जोकर आतून रडका असतो, ही संकल्पना त्यांना पटत नाही. सुख-दु:ख प्रत्येकालाच असतात त्यात आमचे ते काय वेगळे असं तो म्हणतो. सर्कसच्या तंबूत जाताना वैयक्तिक दु:ख बाहेरच गळून जातात. शो झाल्यावर ते पुन्हा चिटकतात असं तो म्हणतो. ‘ शो मस्ट गो ऑन’ हे सत्य प्रामाणिकपणे स्वीकारतो.