आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ संपादक हेमंत कुलकर्णी यांचे हृदयविकाराने निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दैनिक लाेकमतचे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी (वय ६६) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, दोन विवाहित मुली, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे.
   
मूळचे अहमदनगर येथील रहिवासी असलेल्या हेमंत कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण नागपुरात झाले. नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली होती. मुंबईमधून त्यांनी अापल्या पत्रकारितेची सुरुवात केली हाेती. पत्रकारितेच्या कारकीर्दीत त्यांनी अापल्या वेगळ्या लेखनशैलीने स्वतंत्र ठसा उमटवला हाेता. त्यानंतर नाशिकमध्येही त्यांनी जिल्हा प्रतिनिधी ते संपादक अशा विविध पदांवर काम केले. कुलकर्णी यांचा लेखनसंग्रह ‘परखड’ या शीर्षकाखाली जून २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. एक लिहिता संपादक म्हणून त्यांची ख्याती होती.  

‘परखड’ लेखक, संपादक हेमंतराव
छातीत दुखू लागल्याने हेमंतराव कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल केले हाेते. त्वरित अँजिओप्लास्टी करून त्यांच्या धमण्यांतील अडथळे दूर करण्यात आले. हेमंतराव ठीक झाले. सगळ्यांशी गप्पा मारू लागले. मात्र दवाखान्यात भेटायला जाऊन त्यांना त्रास द्यायचा नाही. ते बरे झाले, घरी आले की मग भेटू असे मी ठरविले. मी भेटायला गेलो नाही. पण आज कळले की तेच गेले.
   
हेमंतराव मूळचे नगर जिल्ह्यातील. मुंबईला  ‘लोकसत्ता’मध्ये त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. १९८२ मध्ये ते लाेकसत्तेचे प्रतिनिधी म्हणून अाले आणि नाशिककरच झाले. ३७ वर्षांच्या वास्तव्यामुळे आणि लिखाणाच्या सातत्यामुळे त्यांचे अस्तित्व नाशिककरांच्या अंगवळणी पडले. असा हा आपला नाशिककर पत्रकार आपल्यातून वयाच्या ६६ व्या वर्षी निघून गेला आहे.  पारंपरिक पत्रकारितेची संध्याकाळ व आधुनिक पत्रकारितेचा उदय हा कार्यकाल पत्रकार म्हणून त्यांच्या वाट्याला आला. ते भाषेविषयी काटेकोर असत, नव्हे ती त्यांना अवगतच होती. परखड विचारही रसाळ शैलीत लिहित. ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामी यांचे लिखाणातील दाखले त्यांना सहज आठवत आणि त्याचा ते नेटका वापर करीत. एखाद्या विषयाला किंवा व्यक्तीला विरोध करायचा असल्यास त्यांची शैली उपरोधक होत असे. 

उत्तम म्हणी, वाक‌्प्रचार त्यांच्यापुढे हात जोडून उभे असत. संस्कृत श्लोक आणि वाङ‌्मय दिमतीला असे. सकस मराठी आणि संस्कृतच्या भक्कम विटेवर उभा असलेला हा संपादक. स्वत:ची अशी लेखनशैली त्यांनी निर्माण केली होती. वाचनीय, प्रगल्भ, वाचकाला खिळून ठेवणारी. मला तर त्यांची शैली इतकी परिचित झाली होती, की एखादा पॅरेग्राफ वाचल्याबरोबर हे हेमंतरावांचे लिखाण आहे हे लक्षात येई. त्यांची आणि माझी अनेकदा बऱ्याच विषयांवर मते भिन्न असत. हा झाला विचारसरणीचा भाग. त्यांची ओघवती शैली मला प्रभावित करीत असे. हिंदू धर्माच्या चौकटीत वाढलेला, परंतु पुरोगामी वृत्तीचा हा पत्रकार. धर्म, जात, पंथ, पक्ष, इझम यांच्या पलीकडे पोहोचलेला.

गोविंदराव तळवलकर, माधवराव गडकरी, अरुण टिकेकर अशा पत्रकार महर्षींचा सहवास लाभलेले हेमंतराव नव्या पिढीतील पत्रकारांशीही सख्य ठेवून होते. मितभाषी असलेले हेमंतराव प्रमोद भार्गवे, भरद्वाज रहाळकर अशा मित्रांच्या सहवासात भडभडून बोलायचे आणि खळखळून हसायचे. आपल्या लेखणीचा दरारा समाजातील अपप्रवृत्तीवर ठेवणारे हेमंतराव गेले. ज्या काळात अशा लेखणीची समाजाला गरज असताना, माझ्या जिवलगांपैकी हेमंतराव एक. त्यांच्या जाण्याने माझे व समाजाचे नुकसान मोठे झाले आहे. कधीही न भरून येणारे. 
  - विनायक पाटील, माजी मंत्री नाशिक