आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या काही मिनिटांत शोधला ज्युलीने मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मृतदेह शाेधणारी ज्युली.
नाशिक - लक्ष्मीनारायण घाटापासून बेपत्ता झालेल्या इसमाला शोधण्यासाठी शुक्रवारी रात्री भद्रकाली पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवानांनी गोदाघाटचा परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागल्याने श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकातील ज्युलीने अवघ्या काही मिनिटांतच लक्ष्मीनारायण घाटापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर माग काढत कन्नमवार पुलाजवळ बेपत्ता इसमाचा माग काढला. त्यानंतर मृताची ओळख पटली.

पंचवटीतील लक्ष्मीनारायण पुलाजवळ होंडा सिटी कार (एमएच १५ बीएन ७४००) संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे गस्तीवरील बीट मार्शलने चौकशी केली असता कारमध्ये विषारी औषधाची बाटली, रक्त, बुट सॉक्स पडल्याचे आढळले. याची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांनी धाव घेत चाैकशी सुरू केली. ही कार एका शिक्षिकेने विकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अंबड पोलिस ठाण्याच्या पाठीमागे राहणारे रिअल इस्टेट ब्रोकर मदनलाल बाबुलाल पवार (५६) यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांच्या मुलांनी ही गाडी ओळखली. गाडीतील व्यक्ती कुठे आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस अग्निशामक दलाचे जवान घेत होते. मात्र त्यांना अपयश आल्याने श्वानपथकास पाचारण करण्यात आले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. गायकवाड, डॉग हॅण्डलर नितीन पगारे, हवालदार एस. सी. कानडी यांनी रात्री ११.५० वाजता ‘ज्युली’ या श्वानास गाडीतील बूट सॉक्सचा वास दिला. त्यानंतर काही मिनिटांतच ज्युलीने लक्ष्मीनारायण घाटाच्या रस्त्याने सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील कन्नमवार पुलाखाली बेपत्ता झालेल्या मदनलाल पवार यांचा मृतदेह शोधला.

संशयास्पद मृत्यू
मृताने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची नोंद भद्रकाली पोलिसांनी केली असून, नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात संशयास्पद मृत्यू असल्याचे म्हटल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.