आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jumbo Combing Opration In Panchwati 30 Criminal Arrested

पंचवटीत जम्बो कोम्बिंग ऑपरेशन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत पोलिसांनी जम्बो कोम्बिंग ऑपरेशन करून 25 ते 30 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीशी संबंधितांना अटक करण्यासाठी तसेच तडीपारीनंतरही खुलेआम वावरणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी परिमंडळ 1 चे उपायुक्त साहेबराव पाटील यांनी पंचवटी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पंचवटीतील फुलेनगर, पेठरोड, वाघाडी या भागात पोलिसांनी अचानक छापे टाकून गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या वेळी हातगाड्यांवर तसेच हॉटेलमध्ये अनधिकृतपणे मद्य विक्री व प्राशन करण्याचेही प्रकार समोर आले. पोलिसांनी बेकायदेशीर मद्यही जप्त केले. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मोहिमेत सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक सुदाम वाळके, बाजीराव भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात फौजफाटा होता.

इच्छुकांची रात्र पोलिस ठाण्यात
पंचवटी परिसरात अनेक तडीपार गुंडांचा खुलेआम वावर असल्याच्या तक्रारी येऊनही कारवाई होत नव्हती. तसेच राजकीय वरदहस्तामुळे तडीपारी रद्द झालेले गुन्हेगारही दहशत माजवत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवले गेल्यामुळे सर्वाधिक अडचण महापालिका निवडणुकीतील इच्छुकांची झाली. प्रचाराची भिस्त सांभाळणारे खंदे समर्थकच पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू होती. पंचवटी पोलिस ठाण्यात विविध राजकीय पक्षांशी संबंधित नेत्यांच्याही चकरा सुरू होत्या.

गुन्हेगारांना पकडण्यासाठी ऑपरेशन
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांचे झडती सत्र सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी तीन ते चार तास कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या मोहिमेतून सराईत गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न आहे. 25 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
साहेबराव पाटील, उपआयुक्त