आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकलाही आता ‘जंगल सफारी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जंगलातील प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गदर्शन होण्यासाठी नाशिक दर्शनसारख्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाच्या सहकार्याने निसर्ग पर्यटनासाठी बससेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे नाशिक विभागाचे वनसंरक्षक (वन्य जीव) अनिल मोहन यांनी जागतिक वनदिनानिमित्त व्यक्त केला.

मोहन म्हणाले की, सध्या गिर्यारोहण, जंगली प्राणी-पक्षी, औषधी वनस्पती यांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्यासाठी विभागातील कळसूबाई शिखर, भंडारदरा, नांदूर मध्यमेश्वर, रतनगड, घाटघर येथे निसर्ग पर्यटन विकसित करण्याची योजना आहे.

मोहन म्हणाले, ‘शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जंगलाची माहिती देण्यात येणार आहे. भावी पिढीला कायमस्वरूपी उपयोग होईल असे नियोजन करणार आहोत. जंगलातील पक्षी-प्राणी, वृक्ष, औषधी वनस्पतींसंदर्भात माहिती देण्यासाठी खास गाईड नेमणार आहोत. जंगलावर कोणताही ताण पडणार नाही अशी काळजी घेऊन पाऊलवाटा तयार करून फलक लावणार आहोत. यासाठी विशिष्ट क्षेत्राचीच निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे आपोआप नागरिकांच्या मनात जंगल आणि आदिवासी बांधवांविषयी आदर भावनेची मानसिकता तयार होईल.’’

पर्यटन व रोजगार
आगामी दहा वर्षांच्या नवीन योजना तयार करण्यात येतील. आदिवासी बांधवांना रोजगार प्राप्तीसाठी निवडक जंगल परिसरात जाता येण्यासाठी प्रवेश फी, हॉटेल व्यवसाय, तसेच जंगलात फिरण्यासाठी सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. योजनेच्या खर्चाचा अंदाज करून शासनाकडे निधीची मागणी केली जाईल. अनिल मोहन, वनसंरक्षक

ही स्थळे ठरतील सफारीचे आकर्षण
कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळे
*रतनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, कोकणकडा.
* अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर, > घाटनदेवी.
* सामरथ येथील सांदण दरी (350 ते 400 फूट खोल; पावसाळ्यातील रम्य ठिकाण)
*उंबरदरा येथील व्ह्यू पॉइंट आणि पांझरे बेटाला चहूबाजूने पाण्याचा वेढा.
भंडारदरा
*अम्ब्रेला फॉल (धबधबा), धरण, रंधा फॉल, पावसाळ्यात नेकलेस फॉल, नानी फॉल, कातरूबाई फॉल.
नांदूर मध्यमेश्वर
* धरण जलाशयाजवळ विविध पक्ष्यांसह फ्लेमिंगोचा वावर
* नांदूर मध्यमेश्वर मंदिर
* खेडलेझुंगे येथील 111 फूट उंचीचा हनुमान.
* मारिच मंदिर.
त्र्यंबकेश्वर
* ब्रह्मगिरी (गोदावरीचा उगम)
* दुगारवाडी धबधबा.
* हर्ष आणि वाघेरा किल्ला अवघड असल्याने गिर्यारोहकांसाठी अनोखी सफर; भास्करगड