आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरवी मोजतात बोटावर; परीक्षेत सर्व हजर पटावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पटपडताळणी मोहिमेनंतर राज्यातील अनेक शाळांमधील धक्कादायक वास्तव समोर आले होते. विद्यार्थी गैरहजर असताना शाळा मात्र सर्व शासकीय योजनांचा लाभ पदरात पाडून घेत होत्या. मात्र, महाविद्यालयीन पटपडताळणीनंतर असेच काही उघड होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात हाती काही ठोस लागेल असे दिसत नाही. कारण महाविद्यालयांत सध्या सत्र परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांची पटावरील हजेरी पूर्ण भरत आहे. त्यामुळे तपासणी पथकाकडून माहिती संकलित करण्याची आैपचारिकता केली जात आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने नाशिकसह अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी मोहिमेस सोमवारपासून सुरुवात झाली. शिक्षण सहसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण विभागाकडून मोहीम राबविली जात अाहे. वरिष्ठ महाविद्यालयांत सध्या सत्र परीक्षा सुरू आहे. कला, वाणिज्य विज्ञान शाखेसह इतर अभ्यासक्रमांच्याही प्रात्यक्षिक लेखी परीक्षा सुरू असल्याने महाविद्यालयांतील हजेरी पटावर प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण भरत आहे. परीक्षेच्या कालावधीतच पटपडताळणी मोहीम सुरू झाल्याने तपासणीनंतर फार काही धक्कादायक वास्तव हाती लागेल असे दिसत नाही. त्यामुळे परीक्षेच्या निमित्ताने पटपडताळणीची आैपचारिकता केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

१६ महाविद्यालयांची झाली तपासणी
नाशिक,अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील एकूण अनुदानित महाविद्यालयांची पटपडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी नाशिकमधील ४६ पैकी १६ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात शहरातील प्रमुख महाविद्यालयांचाही समावेश आहे. इतर महाविद्यालयांची दि. २० २१ रोजी पटपडताळणी केली जाणार आहे.

१६७ काॅलेज तपासणार
पटपडताळणी मोहिमेंतर्गत नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील एकूण १६७ अनुदानित महाविद्यालयांची पटपडताळणी केली जाणार आहे. महाविद्यालयातील शाखा, प्रवेशित विद्यार्थी संख्या, हजेरी पटावरील विद्यार्थ्यांची नियमित संख्या, प्राध्यापकांची दैनंदिनी यांसह विविध स्वरूपातील १७ प्रकारांची माहिती या मोहिमेत संकलित केली जाईल.

माहिती सादर केली...
^कला,वाणिज्य विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिक सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती असून, पटपडताळणी करताना सर्व माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तुकडीनिहाय विद्यार्थ्यांचे प्रवेश हजेरी पटावरील संख्या अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. -प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, एचपीटी कॉलेज