आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीही ‘फिक्सिंग’च्या भोवर्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - क्रिकेटच्या ‘मॅच फिक्सिंग’चे किस्से सगळ्यांनाच ज्ञात असले तरी ज्या खेळाला महाराष्ट्राचा खेळ म्हणून गौरविले जाते, त्या कबड्डीलाही ‘मॅच फिक्सिंग’चा कलंक लागल्याचा दाट संशय आहे. विशेष म्हणजे, हे ‘मॅच फिक्सिंग’ राष्ट्रीय संघात स्थान मिळावे म्हणून महाराष्ट्राच्याच दोघा खेळाडूंनी केले असल्याचा आरोप खुद्द महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकानेच केला असून, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य संघटनेने त्रिसदस्यीय समितीचेही गठन केले आहे.

बिहारमध्ये गत महिन्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्रविरुद्ध राजस्थान असा खेळला गेला. त्यात राजस्थानकडून महाराष्ट्राला धक्कादायकरीत्या पराभव स्वीकारावा लागला होता.

साखळीत दणदणीत विजय राजस्थानला महाराष्ट्राने साखळी फेरीत 23 गुणांच्या फरकाने हरवून दणदणीत विजय मिळवला होता. ज्या संघाला इतक्या मोठय़ा फरकाने हरवले, त्याच संघाकडून महाराष्ट्र पराभूत होईल, असा विचारही कोणाच्या मनात आला नव्हता. महाराष्ट्राचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने कबड्डीतील जाणकारांना तसेच मैदानावर उपस्थित कबड्डी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकार्‍यांना जबर धक्का बसला.

कठोर कारवाई करणार
महाराष्ट्राचा संघ ज्या संघाकडून आणि ज्या पद्धतीने हारला, ते धक्कादायक होते. काही खेळाडूंचा खेळ संशयास्पद असल्याबाबत प्रशिक्षक आणि कार्यकारी सदस्यांनी तक्रार केली आहे. राज्य संघटनेच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. सामना फिक्स असल्याचे सिद्ध झाले तर ती महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच शरमेची बाब ठरेल. त्यामुळे संबंधित खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात येईल. - दत्ता पाथ्रीकर, कार्याध्यक्ष, राज्य कबड्डी संघटना

अहवालासाठी महिन्याची मुदत
आरोपांच्या चौकशीसाठी राज्य संघटनेच्या बैठकीत सुनील जाधव, प्रकाश बोराडे आणि र्शीमती सपकाळे यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अहवाल सादर करण्यासाठी त्यांना महिन्याची मुदत दिली आहे.

7 वेळा बाद
अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या एका खेळाडूला राजस्थानच्या एकाच खेळाडूने एकाच कोपर्‍यात 7 वेळा बाद केले. तसेच, अखेरच्या क्षणी सामना बरोबरीत होता त्याचवेळी ज्याने एन्ट्री टाकू नये असे सांगण्यात आले होते, त्यानेच एन्ट्री टाकून तो सहज बाद झाल्याने महाराष्ट्राच्या हातून विजेतेपद निसटले.

संघ प्रशिक्षकाची तक्रार
महाराष्ट्राच्या संघातील दोन खेळाडूंना भारताच्या संघात स्थान मिळवून देण्याची ‘ऑफर’ देण्यात आल्यामुळेच त्या दोघांनी अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राच्या पराभवासाठीच ‘खेळ’ केल्याचा आरोप महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडगिरी व काही कार्यकारी सदस्यांनी थेट राज्य कबड्डी संघटनेकडेच केला आहे.