आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalaram Mandir Movement In Nahsik Sahankarrao Gaikwad

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे अग्रणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळाराम मंदिर सत्याग्रहाला शनिवारी 83 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त या आंदोलनातील पहिले सत्याग्रही शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. 2 मार्च 1930 ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड यांचा सभासद म्हणून समावेश केला होता. कमिटीतर्फे महाराष्ट्रभर सत्याग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील; पण नाशिकला मोठा राजवाडा येथे स्थायिक झाले होते.

रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटिश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. शहरात तणावपूर्ण शांतता होती. अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टिळा अशा वेशात शंकरराव 2 मार्चला रामकुंडावर आले व अंगातील वेश उतरवून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश, दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

जीवाची पर्वा न करता सत्याग्रह यशस्वी करणार्‍या गायकवाड यांची यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठय़ा राजवाड्यातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल करण्यात आली. सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना ‘तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी ‘डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.

डॉ. आंबेडकर यांनी भारतात परतल्यावर दादासाहेब गायकवाड, सावळीराम दाणी, सखाराम वस्ताद काळे, तुळशीराम काळे, अमृतराव रणखांबे, रंगनाथ भालेराव व भादुजी निकाळे यांच्या उपस्थितीत बेलमास्तरांचा सत्कार केला. वीर शंकरराव गायकवाड यांचे 16 ऑक्टोबर 1956 ला निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नाशिक-पुणे रोडवर वडाळा नाक्यावरील चौकाचे भूतपूर्व नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते शंकरराव श्रावण गायकवाड ऊर्फ बेलमास्तर चौक असे नामकरण करण्यात आले.

निवेदन : विवेक गायकवाड / शब्दांकन : दत्ता कपिले