आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalidas Kala Mandir,Latest News In Divya Marathi

कालिदास’च्या नूतनीकरणाच्या कार्यवाहीला पालिकेकडून प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेचा विषय ‘दिव्य मराठी’ने पंधरा दिवसांपासून लावून धरला होता. या प्रश्नावर शहरातील सर्व रंगकर्मी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी एकत्र आले होते. रविवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी शहरात आले असता, त्यांच्या उपस्थितीतील बैठकीत ‘कालिदास’च्या नूतनीकरणाच्या कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे ‘कालिदास’चे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांनी सांगितले.
परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कालिदासच्या नूतनीकरणावर चर्चा झाली. यापूर्वीही जोशी यांची स्वाक्षरी असलेले मागण्यांचे निवेदन पालिका अधिकार्‍यांना दिले होते. त्याचे काय झाले तसेच कलाकारांना जेवण करण्यासाठी जागा देणे व इतर मुद्यांवर चर्चा झाली. या वेळी परिषदेचे नाशिक शाखेचे अध्यक्ष नेताजी भोईर, मध्यवर्ती शाखेचे कार्यकारिणी सदस्य सुनील ढगे, नियामक मंडळ सदस्य राजेंद्र जाधव, नाशिक शाखा सदस्य शाहू खैरे व पदाधिकारी उपस्थित होते.

भाटकर संतापले : कलादालनाच्या बाजूकडील जेवणाच्या जागेचे छायाचित्रकार फोटो टिपत असताना अभिनेते रमेश भाटकर संतापले आणि फोटो काढू नका, असे म्हणाले. मोहन जोशी त्या ठिकाणी आले असता भाटकर त्यांना म्हणाले की, आपण परिषदेचे अध्यक्ष आहात, तरीही जेवणासाठी चांगली जागा नाही.
काम लवकर होण्याची अपेक्षा
काही दिवसांपूर्वीच मी व्यवस्थापक कहाणे, पालिकेचे वास्तुविशारद धुमणे, माडीवाले यांच्यासह नाट्यगृहाची पाहणी केली. पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, नूतनीकरणासाठीच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे. रंगकर्मींनी मांडलेल्या या मागण्या आहेत. ती कामे लवकर व्हावीत, ही अपेक्षा आहे. शाहू खैरे, नगरसेवक तथा सदस्य, नाट्य परिषद, नाशिक शाखा
डिसेंबरनंतर प्रेक्षागाराच्या फ्लोरिंगचे काम
रसिकांना बाहेर बसण्यासाठी जागा केली आहे. कलाकारांना जेवणासाठी तळघरात सोय करत आहोत. डिसेंबरनंतर प्रेक्षागाराचे फ्लोरिंग बदलून नूतनीकरण सुरू होईल. रंगकर्मींच्या सूचनांचा विचार केला जाईल. जगन्नाथ कहाणे, व्यवस्थापक, कालिदास कलामंदिर
मध्यवर्ती शाखा आर्थिक मदत देणार
रंगमंच व्यवस्था वा अँम्पी थिएटर बांधण्यासाठी मध्यवर्ती शाखा आर्थिक मदत करेल. ‘कालिदास’संदर्भातील विषय मध्यवर्ती शाखेच्या बैठकीत मांडून तो मंजूर करून घेण्यात येईल आणि चांगलं नाट्यगृह रसिकांना कसं उपलब्ध करून देता येईल, यादृष्टीने प्रयत्न होतील. मोहन जोशी, अध्यक्ष, अ. भा. नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा
अँम्पीथिएटरबाबत दिले निवेदन
या बैठकीत नाट्य परिषद कार्यालयाला लागून टेरेस वजा पडीक जागेवर शेड टाकून व कार्यालयातून दरवाजा करण्याबाबत चर्चा झाली. शेडचा खर्च परिषद उचलणार आहे. या जागेचा उपयोग नाट्य परिसंवाद वा शिबिरांसाठी होणार आहे. तसेच आऊटहाऊसजवळ अँम्पीथिएटर उभारण्यात यावे. याचा उपयोग कलाकारांना छोटे प्रयोग करण्यासाठी येऊ शकेल. याचेही बांधकाम परिषद व लोकनिधीतून करण्यास येईल. या दोन महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन व्यवस्थापक कहाणेंकडे जोशी यांनी दिले.