आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथक नृत्यासाठी नाशकात ‘गुरुकुल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुरुकुल पद्धतीनुसार आपल्या शिष्यांना कथक नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना व बिरजू महाराजांच्या शिष्या विद्या देशपांडे झटत आहेत. आपल्या घरीच त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुकुल परंपरेसाठी निवासापासून सर्व सुविधा उपलब्ध करून देत ही परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. लवकरच त्या गंगापूर धरणानजीक हक्काचे गुरुकुल बांधणार आहेत. नाशिकच्या नृत्यसंस्कृतीत गुरुकुल परंपरा जोपासणारा हा अभिनव उपक्रम ठरणार आहे.

विद्याताईंकडे शिकण्यासाठी केवळ पुण्या-मुंबईहूनच नाही तर मध्य प्रदेश, रायपूर, बिलासपूर, दिल्ली, छत्तीसगड अशा विविध राज्यांतून व प्रदेशांतून मुली येतात. सध्या त्यांच्याकडे दहा ते पंधरा मुली गुरुकुल पद्धतीनुसार शिक्षण घेण्यासाठी येतात. साधारणपणे आठ ते दहा दिवस त्या विद्याताईंकडेच शिकतात आणि त्यांच्यासोबतच राहतात. यादरम्यान, त्यांना केवळ नृत्याचे शिक्षणच मिळत नाही तर आपल्या गुरूंचे व्यक्तिमत्त्वाचे निरीक्षणही करायला मिळते, त्यांचे विचार ऐकायला मिळतात. त्यामुळे क्लासरूम टीचिंगच्या पलीकडे जाऊन या परंपरेनुसार शिष्यांना नृत्याचे धडे गिरवता येतात.

काय असतात गुरुकुल पद्धतीचे सिद्धांत : दीख्या, सीख्या आणि परख्या हे गुरुकुल पद्धतीचे तीन सिद्धांत आहेत जे क्लासरूम टीचिंगपेक्षा गुरुकुल पद्धतीला कैक पटीने सरस ठरवतात. दीख्या म्हणजे बघणे, सीख्या म्हणजे शिकणे आणि परख्या म्हणजे पारखणे. गुरुकुल पद्धतीत गुरूबरोबर राहण्यास मिळत असल्याने त्यांचे राहणीमान, त्यांचे वागणे, बोलणे, त्यांच्या इतर कलावंतांविषयीची मते, त्यांच्याबरोबर कथक वा इतर कार्यक्रम अटेंड करणे हे बघणे, अनुभवणे शिष्यांच्या एकूणच ज्ञानात भर टाकते. याचबरोबर गुरूकडून वेळेची र्मयादा ओलांडून नृत्य शिकता येते जे सीख्या या सिद्धांतात मोडते. परख्या या सिद्धांतामध्ये शिष्याला गुरूच्या सहवासामुळे, गुरूकडून शिकण्यामुळे जग आणि जे शिकतोय ते ओळखण्याची, पारखण्याची दृष्टी मिळते हा अर्थ समाविष्ट आहे. विद्याताई आपल्या शिष्यांना याच तीन सिद्धांतांच्या आधारावर शिकविण्याची परंपरा जोपासत आहेत.

‘मोबाईल गुरूं’ची आधुनिक परंपराही होतेय रूढ : कथक नृत्यात आधुनिक म्हणजे मोबाइल गुरूपद्धतीही अनेक दिग्गज कथकगुरूंनी रूढ केली आहे. विद्याताईदेखील ही पद्धत अवलंबवली. बिलासपूर, मुंबई, छत्तीसगड येथे जाऊन तेथील शिष्यांना तिथेच निवासी कार्यशाळा घेऊन गुरुकुल पद्धतीने शिकवतात. ही पद्धत अवलंबवणे शिष्यांचा विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे विद्याताई सांगतात. अनेकदा विद्याताई नाशिकच्याच शिष्यांना नेऊन बिरजू महाराजांकडे निवासी पद्धतीने कथक कार्यशाळेच्या माध्यमातून ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात.

परंपरेचे महत्त्व वाढीस
गुरुकुल पद्धतीमध्ये पूर्वी एका गुरूकडे शिकणार्‍या शिष्याने गुरू बदलणं अत्यंत वाईट समजलं जायचं, त्या शिष्यावर बहिष्कार टाकला जायचा. आता गुरुकुल पद्धतीत असलेला हा नकारात्मक प्रघात कमी झाल्याने उलट या परंपरेचे महत्त्व शिष्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विद्या देशपांडे, कथक नृत्यांगना, अभिजात नृत्यसंस्था