आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसीप्रकरणी इंटरपोल नोटिसीसाठी माहिती द्या, न्यायालयाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या केबीसीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या अटकेसाठी इंटरपोल मार्फत रेडकॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया आणि सिंगापूरच्या कोणत्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात वॉरंट बजावणार, याबाबतची माहिती पोलिसांनी सादर करावी, असे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले. त्याचबरोबर संश्यितांचे लॉकर उघडण्यापूर्वी पोलिसांनी ज्यादिवशी बॅँकाना खाते गोठविण्याची सूचना केली, त्यानंतर आजपर्यंतची स्थिती कळविण्याचेही आदेश पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे यावरील निर्णय आणखी दोन - तीन दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

केबीसीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण व त्याच्या कुटूंबीयांनी केलेल्या फसवणुकीची व्याप्ती 1 हजार कोटींपर्यंत पोहचली असून गुंतवणूकदारांची संख्या लाखावर पोहचली आहे. आर्थिक गुन्हा शोध पथकाकडून चव्हाण दाम्पत्याच्या अटकेसाठी रेडकॉर्नर नोटीस बजावण्यात येणार आहे. पोलिसांकडून जिल्हा न्यायालयात नोटीस बजावण्यापुर्वी चव्हाण दाम्पत्याच्या अटकेसाठी वॉरंट बजावण्याची परवानगी जिल्हा सत्र न्यायधीश एन.यू. कापडी यांच्याकडे मागितली आहे.

सरकारी वकील र्शीधर माने यांनी न्यायालयाकडे मोठय़ाप्रमाणात फसवणूक झाली असून संशयितांचे लॉकर उघडल्यास निश्चीत मालमत्तेचे कागदपत्रे, रोकड हाती लागेल, त्यासाठी परवानगी मागितली. या दोन्ही अर्जावर न्यायालयाकडून गेल्या दोन दिवसांपासून निर्णय अपेक्षित असतानाच बुधवारी पुन्हा न्यायालयाने पोलिसांना रेडकॉर्नर नोटीस बजावण्यासाठीची प्रक्रिया आणि इंटरपोलमार्फत कुठल्या न्यायालयच्या कार्यक्षेत्रात नोटीस बजावली जाणार आहे. त्याची माहिती सादर करण्याची सुचना केली. तसेच, संशयितांचे बॅँक खाते गोठवल्यानंतरही त्यांनी त्यात काही व्यवहार केला की नाही, याची देखील महिती बॅँकाकडे तपासून ती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा ही सुनावणी लांबणीवर पडून दोन ते तीन दिवसात निर्णय लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.