आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KBC Fraud News In Marathi, Bhusaheb Chavan, Divya Marathi

केबीसीचा मुख्य सूत्रधार सिंगापूरच्या वारीवार, केंद्र इंटरपोलद्वारे बजावणार नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब छबू चव्हाण हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून सिंगापूरला परागंदा झाला आहे. आता त्याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून इंटरपोलद्वारे रेडकॉर्नर नोटीस बजावण्याच्या पर्यायावर पोलिस विचार करत आहेत. ही प्रक्रिया किचकट असली तरी त्यात नक्कीच यश येईल, असा दावाही पोलिस करत आहेत. दरम्यान, विदेशात जाऊन चंगळ करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच चव्हाणने हा आटापिटा करत कोट्यवधींची माया जमवल्याचे आता समोर येत आहे.

चांदवड तालुक्यातील हरनूरचा मूळ रहिवासी भाऊसाहेब याने निफाड येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर तो निफाड तालुक्यातील वनसगाव येथे वास्तव्यास होता. नाशकात व्यावसायिकाकडे काम करत असतानाच झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्यासाठी शेअर्समध्ये तो पैसे गुंतावयाचा. त्यात तोटा झाल्याने नंतर चव्हाण ‘एमएलएम’कडे वळला. या व्यवसायातही त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाले. त्यानंतर कुटुंबीयांनीही त्याच्याशी संपर्क कमीच केला.
भाऊसाहेबचा भाऊ बापूसाहेब हा जिल्हा बॅँकेत कॅशिअर, तर दुसरा भाऊ नाना हा नाशकात खासगी नोकरी करायचा. भाऊसाहेबने 2009 मध्ये आडगाव नाका येथे डीबीसी एमएलएम सुरू केले. तिथे काही प्रमाणात पैसा कमावला. त्यातून फोर्ड आयकॉन कार खरेदी केली. त्यानंतर पुन्हा व्यवसायात अपयश आले. मात्र, चार महिन्यांतच त्याने केबीसी कंपनी सुरू केली. गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने फोर्ड कार विकून मारुती कार घेतली, तरीही आर्थिक घडी बसत नसल्याने तीही कार विकून जुन्या दुचाकीवर काम धकवले, खासगी दुकानात नोकरीही केली. नंतर मात्र लोकांना श्रीमंतीचे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले व विदेशात जाण्याचे आपले स्वप्न त्याने पूर्ण केले.

कायद्याचा हिसका दाखवाच : भाजप
लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या केबीसीसारख्या चिट फंड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी लोकसभेत केली.
राज्यातील चिट फंडमध्ये सुमारे 10 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. नाशिक, औरंगाबाद, जालना यासारख्या भागात असलेल्या गुंतवणूकदारांना अशा चिट फंड कंपन्यांनी लक्ष्य करून जाळ्यात ओढले. महाराष्ट्र सरकारने ही प्रकरणे गांभीर्याने घेतली नाहीत. म्हणूनच असे प्रकार वाढल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

पोलिस निलंबित; मालमत्ता गोठविली
केबीसी फसवणूकप्रकरणी अटकेत असलेला पोलिस संजय जगताप यास न्यायालयाने गुरुवारी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच पोलिस दलातूनही त्याला निलंबित करण्यात आले आहे. जगताप याचे वेतन, भविष्य निर्वाहनिधीची रक्कम व इतर मालमत्ता गोठविण्यात आली आहे.

वाशिमकरांचे 200 कोटी अडकले
‘केबीसी’ घोटाळ्यात विदर्भाच्या हजारो गुंतवणूकदारांचेही दिवाळे निघाले आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यातील सुमारे 200 कोटी रुपये या योजनेत अडकल्याची चर्चा असून गुंतवणूकदार हवालदिल आहेत.

गुंतवणूकदारांचा मोर्चा स्थगित
नाशिक २ केबीसी मल्टिनॅशनल कंपनीविरोधात गुरुवारी नाशिकमध्ये मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी बंदोबस्ताअभावी हा मोर्चा स्थगित करण्यास गुंतवणूकदारांना भाग पाडले. संशयितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी यावेळी दिले.

मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून असंख्य गुंतवणूकदार शहरात आले होते. मात्र पोलिसांच्या भूमिकेमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान, केबीसीविरोधात लढा देण्यासाठी गुंतवणूकदारांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे